कबड्डी खेळाडूला राजकारणाचा 'खो'

राज्य कबड्डी सामन्यात ठाणे जिल्ह्याचं कर्णधारपद भूषवलेली अद्वैता मांगले ही या स्पर्धेतील गुणपत्रिकेत पहिल्या क्रमांकावर होती. मात्र, तरीदेखील राष्ट्रीय सामन्यांसाठी तिचा समावेश करण्यात आलेला नाही.

Updated: Dec 17, 2011, 05:24 PM IST

झी २४ तास वेब टीम, ठाणे 

 

खेळात राजकारण नवं नाही.मात्र खेळामध्ये होणाऱ्या राजकारणामुळे आपला खेळ सोडण्याची वेळ ठाण्यातील एका हुषार कबड्डीपटूवर आलीय. राज्य कबड्डी सामन्यात ठाणे जिल्ह्याचं कर्णधारपद भूषवलेली अद्वैता मांगले ही या स्पर्धेतील गुणपत्रिकेत पहिल्या क्रमांकावर होती. मात्र, तरीदेखील राष्ट्रीय सामन्यांसाठी तिचा समावेश करण्यात आलेला नाही.

 

यासाठी वरून दबाव आल्याचं उत्तर अद्वैताला निवड समितीनं दिलंय. अद्वैता मुंबई विद्यापीठाकडून ५ वर्षे खेळत होती. अशा गुणी खेळाडूला जाणूनबुजून डावलण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप तिच्या प्रशिक्षकांनी केलाय.  अद्वैताला न्याय मिळावा यासाठी आता ठाणे महापौरांनी महाराष्ट्र कबड्डीचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहून न्याय मागितलाय. अद्वैताला न्याय न मिळाल्यास या प्रकाराविरोधात कोर्टात दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलंय.

 

कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला खेळ. पण त्यातही राजकारण आल्यानं चांगले खेळाडू मागे पडताएत. त्यामुळं गुणानुसार पात्रता ठरवली नाही तर खेळाडूंवरच नाही तर खेळावरही अन्याय होणारच.