www.24taas.com, मुंबई
मनपा निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवाजी पार्क मैदान मिळवण्यावरून शिवसेना आणि मनसेत रस्सीखेच सुरु आहे. शिवसेनेला हे मैदान मिळू नये म्हणून मनसेचा आटापिटा सुरु असताना आधी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा विचार सोडून दिलेल्या शिवसेनेनंही आता याच मैदानासाठी धावपळ सुरु केली आहे.
१२ आणि १३ फेब्रुवारीला मेळावा घेण्यास महापालिकेनं परवानगी नाकारल्यामुळे मनसेनं हायकोर्टात धाव घेतली असून त्यावर २ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यापेक्षा शिवसेनेला हे मैदान मिळू द्यायचं नाही असा मनसेचा डावपेच असल्यानं आता शिवसेनेनं १२ आणि १३ फेब्रुवारीला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली आहे.
त्यामुळे शिवसेना आणि मनसे यापैकी कुणाला परवानगी मिळणार आणि शिवाजी पार्कवर कुणाचा आवाज घुमणार याची उत्सुकता आहे. पण आता दोन्ही पक्षांत सुरु असलेली लढाई ही पक्षाच्या मेळाव्याला मैदान मिळवण्यापेक्षा ते एकमेकांना मिळू नये यासाठी दोन्ही पक्षांचा आटापीटा सुरु आहे.