`दादा... आक्रमकतेला मुरड घाला`

By Shubhangi Palve | Last Updated: Monday, October 1, 2012 - 11:04

www.24taas.com, मुंबई
कोळसा घोटाळ्यावरुन लक्ष हटवण्यासाठी काँग्रेसनं बळीचा बकरा बनवल्याचा दावा करणाऱ्या अजित पवार यांच्या टीकेला काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलयं. ‘अजितदादांनी टीका करणं थांबवावं अन्यथा त्यांना सडेतोड भाषेत उत्तर देऊ’ असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय. कोळसा घोटाळा हा केंद्र सरकारशी संबधित आहे. त्यामुळं अजितदादांनी मांडलेली थिअरी पटणारी नाही असंही माणिकरावांनी म्हटलयं. मंत्रिपदावरुन पायउतार झाल्यानंतर अजितदादा जास्त आक्रमक झालेत. आपल्या आक्रमकतेला त्यांनी मुरड घालावी, असा सल्ला द्यायलाही यावेळी माणिकराव विसरले नाहीत.
अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात अजित पवारांनी थेट काँग्रेसलाच लक्ष्य केलं होतं. कोळसा घोटाळ्यावरून लक्ष हटवण्यासाठीच माझ्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप केले जात असल्याचा घणाघात अजित पवारांनी काँग्रेसवर यावेळी केला होता. तसंच आपल्याकडून राजीनामा मागितला नाही तर आपण तो तोंडावर फेकला असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सिंचनाची श्वेतपत्रिका लवकरात लवकर काढून सत्य बाहेर येऊ द्या, असं आव्हानही त्यांनी दादांनी काल काँग्रेसला दिलंय.

First Published: Monday, October 1, 2012 - 10:58
comments powered by Disqus