अमित शहांना ‘BCCI’च्या उपाध्यक्षपदाची लॉटरी?

भाजप नेते अमित शाह नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जातात... नरेंद्र मोदींची जवळीक इतरांपेक्षा अमित शहांकडे थोडी जास्तच आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. म्हणूनच, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहांना लॉटरीच लागण्याची चिन्ह दिसतायत.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 15, 2014, 05:57 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजप नेते अमित शाह नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय समजले जातात... नरेंद्र मोदींची जवळीक इतरांपेक्षा अमित शहांकडे थोडी जास्तच आहे असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरणार नाही. म्हणूनच, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अमित शहांना लॉटरीच लागण्याची चिन्ह दिसतायत.
सध्या, अमित शहा हे गुजरात क्रिकेट असोसिएशनचं म्हणजेच जीसीएचं उपाध्यक्षपदी विराजमान आहेत. निवडणूक निकालानंतर मोदी सरकारात शहांनाही प्रमोशन मिळणार हे नक्की... प्रमोशननंतर ते डायरेक्ट बीसीसीआयच्या उपाध्यक्ष पदावर पोहचणार असल्याचं समजतंय.
देशात यूपीए सरकारची गच्छंती होऊन मोदी सरकार आलं तर त्याचा परिणाम राजकीय क्षेत्राबरोबरच इतरही क्षेत्रांवर दिसून येईल, हे तर नक्की... हाच परिणाम क्रिकेटवरही होऊन बीसीसीआयची कार्यकारिणी बदलण्याची शक्यता आहे.
सध्या, मुंबई क्रिकेट संघटनेचे रवी सावंत सध्या बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. या जागेवर पश्चिम विभागातून अमित शाह यांचं नाव आघाडीवर आहे. किंबहुना, त्यांच्या निवडीसाठी सर्व तयारी झाली आहे आणि या पदासाठी आवश्यक निकष त्यांनी पूर्ण केलेत, असं जीसीएकडून सांगण्यात आलंय.
अमित शहा यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात प्रचाराची धुरा सांभाळली होती. शहांचं आणि बीसीसीआयचं नाव जोडलं जात असल्यानं अचानक गुजरात क्रिकेट असोसिएशन प्रकाशझोतात आलेली दिसतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.