रिटेलमधील गुंतवणुकीचे स्वागत करायला पाहिजे

भारतात थेट परदेशी गुंतवणूक वाढायला पाहिजे असं माझं मत आहे. आज चीनमध्ये 60 दशलक्ष डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली आहे. त्या तुलनेत भारतात फक्त चार दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. जगाच्या एकूण गुंतवणुकी पैकी फक्त तीन ते चार टक्केच गुंतवणूक भारतात करण्यात येते. देशात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक झाली तर व्यापाराला चालना मिळेल.

Updated: Nov 28, 2011, 04:24 PM IST

झी 24 तास वेब टीम, मुंबई

डॉ. रामदास गुजराती

अध्यक्ष,मुंबई ग्राहक पंचायत

 

भारतात थेट परदेशी गुंतवणूक वाढायला पाहिजे असं माझं मत आहे. आज चीनमध्ये 60 दशलक्ष डॉलर्सची परदेशी गुंतवणूक झाली आहे. त्या तुलनेत भारतात फक्त चार दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे. जगाच्या एकूण गुंतवणुकी पैकी फक्त तीन ते चार टक्केच गुंतवणूक भारतात करण्यात येते. देशात मोठ्या प्रमाणावर परदेशी गुंतवणूक झाली तर व्यापाराला चालना मिळेल. व्यापाराला चालना मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

 

रिटेलमध्ये 51 टक्के थेट परदेशी गुंतवणुकीला परवानगी देताना फक्त 10 लाखाहून अधिक वस्तीच्या शहरांमध्येच आऊटलेट उघडता येतील अशी अट कायम ठेवण्यात आली आहे. खरतरं ती अट शिथिल करणं आवश्यक होतं, ही मर्यादा काढून टाकायला हवी होती. त्यामुळे वाव कमी मिळणार आहे.

 

भारतीय ग्राहकाची बदलांच्या आहारी जाण्याची मानसिकता नाही. त्याला अत्यंत व्यक्तिगत स्वरुपाची सेवा हवी असते. भारतीय ग्राहक घरा जवळच्या ठिकाणाहून आपल्या गरजा भागवण्याला प्राधान्य देतो, तसेच मॉल घरापासून खूप लांब असेल तर जाणं पसंत करत नाही. ग्राहक गरज पडेल तेंव्हाच खरेदी करण्याकडे त्याचा कल असतो, एकदम खरेदी करण्याला तो पसंती देत नाही आणि छोट्या प्रमाणावर खरेदी करतो.

 

देशात मोठ्या प्रमाणावर मॉल्स उभे राहिले तर दुकानदारांचे नुकसान होईल ही भीती निराधार आणि अनाठायी आहे. परदेशी रिटेल चेनचा छोट्या व्यापाऱ्यांवर परिणाम होत नाही, तसंच छोट्या व्यापाऱ्यांना ग्राहकांचा आश्रय लाभतो. भारतीय अर्थव्यवस्थेत गुंतवणूक
शोषण्याची ताकद आहे.

 

अहमादाबादमध्ये मॉल संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी 10 मोठ्या मॉल्समध्ये ग्राहकांच्या आवडीनिवडींची पाहणी करण्यात आली. या पाहणीतून दोन ते तीन प्रमुख निष्कर्ष निघाले. पहिला निष्कर्ष मॉल संस्कृतीची वाढ मंद गतीने होत आहे. तसेच ग्राहकांचा मॉलमध्ये खरेदी
करण्याचा उत्साह ओसरलेला आहे. जवळपास निम्म्याहून अधिक ग्राहकांचे मॉल्सचे आकर्षण कमी होत चाललेलं आहे. आजकाल लोकं मॉल्समध्ये खरेदीच्या ऐवजी केवळ बघण्यासाठी अधिक संख्येने जातात आणि तेही विशेष सणासुदीच्या दिवसांमध्ये जातात.

 

रिटेलमधील परदेशी गुंतवणुकीचा फायदा निश्चित शेतकऱ्यांना होईल. रिटेल कंपन्या शेतकऱ्यांना भांडवल, तंत्रज्ञान, बी बियाणे, मार्गदर्शन असे सर्व तऱ्हेचे पाठबळ पुरवतील त्यामुळे विरोध करणं चुकीचे ठरेल.

 

Tags: