अग्निची चाचणी चीनसाठी धोक्याची घंटा

Last Updated: Sunday, December 18, 2011 - 12:36

झी २४ तास वेब टीम, बिजिंग

भारत फेब्रुवारी महिन्यात अग्नि-V क्षेपणास्त्राची चाचणी घेणार आहे त्याबद्दल चीनच्या सरकारी माध्यमांनी ही धोक्याची घंटा असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

 

चीनची महत्वाची अनेक शहरं या लांब पल्ल्याच्या संहारक क्षेपाणस्त्राच्या टप्प्यात येतील. आणि भारताची आशियात महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा त्यामुळे अधोरेखित होते, असं मत चीनच्या माध्यमांनी व्यक्त केलं आहे. भारतीय लष्करी अधिकाऱी आणि  शास्त्रज्ञांनी आशियातील सत्तेचा समतोल राखण्याच्या दृष्टीने अग्नि-V हे संहारक क्षेपणास्त्र भारताच्या भात्यातील महत्वाचे अस्त्र ठरेल असा दावा केल्याचे चीन सरकारच्या पिपल्स डेलीने म्हटलं आहे.

 

भारताला जागतिक महासत्ता होण्याची महत्वाकांक्षा असून त्यासाठी जगाच्या पटलावर महत्वाची भूमिका बजावण्याची इच्छा आहे. त्यामुळेच सुरक्षेच्या संदर्भात अंतर्गत आणि बाह्य आव्हानांचा मुकाबला करण्याच्या दृष्टीने भारत व्युहरचना आखत असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.  भारत महासत्ता होण्याच्या दृष्टीने लष्करी सामर्थ्य आणि क्षमता उभारत असल्याचं  कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायनाचे मुखपत्र असलेल्या पिपल्स डेलीने म्हटलं आहे. भारताने मागच्या महिन्यात तीन हजार किलोमिटर टप्पा क्षमता असलेल्या अग्नि IV ची ययशस्वी चाचणी केल्याचं वृत्तही चीनी माध्यमांनी दिलं होतं. डीआरडीओचे डायरेक्टर जनरल व्ही.के.सारस्वत यांनी फेब्रुवारी अग्नि -V चाचणी घेण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. अग्नि I आणि II ही क्षेपणास्त्र पाकिस्तान तर अग्नि III, IV आणि V हे चीनचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन विकसीत केल्याचं तज्ञांचे मत आहे.

 

चीनने लांब आणि मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र तिबेट आणि झिनजियाँग प्रांतात तैनात केल्याचं वृत्त अमेरिकन माध्यमांनी दिलं आहे. चीनने जून्या द्रव इंधनावर आधारीत अण्वस्त्र सज्ज क्षेपणास्त्रांच्या जागी आता अत्याधुनिक घन इंधनावर आधारीत क्षेपणास्त्रांची निर्मितीत केल्याचं युएस डिपार्टमेंट ऑफ डिफन्स रिपोर्टेने म्हटलं आहे. भारताने संरक्षण सज्जतेच्या दृष्टीने चीनच्या सीमेवर एक लाख सैन्य तैनात करण्याचा निर्णय संवेदनशील असल्याचं वृत्त मागच्या महिन्यात दिलं होतं.

 

भारताच्या या निर्णयामुळे प्रदेशात तणावपूर्ण वातावरण निर्माण होईल आणि भारताच्या हितसंबंधांना त्यामुळे बाधा निर्माण होईल असं या वृत्त म्हटलं होतं. स्वीडन स्टॉकहोल्म इंटरनॅशनल पिस रिसर्च इन्स्टिट्युटने भारत जगातील सर्वात मोठं शस्त्र आयातदार देश झाल्याचं आणि अनेक देशातून शस्त्र सामुग्री आयात केल्याचं एका नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटलं आहे. भारत संरक्षण क्षमतेत वाढ करण्यासाठी ८.२ बिलियन अमेरिकन डॉलर्सची शस्त्रसामुग्री आयात करणार असल्याचंही चीनच्या पीपल्स डेलीने म्हटलं आहे.

 

 

First Published: Sunday, December 18, 2011 - 12:36
comments powered by Disqus