मुंबई : पाकिस्तानचे नागरिक आहेत म्हणून एका कुटुंबाला मुंबईतल्या हॉटेल्सनं रुम नाकारल्याचं समोर आलंय.
मानसिक आजारी असलेल्या आपल्या लहानग्यासाठी दुआँ मागण्यासाठी हे कुटुंब मुंबईत दाखल झालं होतं. 'हाजीअली'ला जाऊन 'मन्नत' पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती.
परंतु, या कुटुंबाला कोणत्याही हॉटेलनं राहण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या बाहेर रात्रभर बसून राहावं लागलं, असं मुलाचे वडील इनायत अली मोहम्मद शकील यांनी म्हटलंय.
या कुटुंबातील एकूण सहा जण मुंबईत आलेत. यामध्ये ३ महिला, २ पुरुष आणि एका १२ वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. ओळखपत्र म्हणून त्यांनी ज्यावेळी आपला पासपोर्ट हॉटेलमध्ये दाखवला, त्यावेळी त्यांना नकार मिळाला. जवळपास ४० हॉटेल्समध्ये ते फिरले... पण, हाती निराशाच पडली. सर्व हॉटेलनं त्यांच्याकडे फॉर्म सीची मागणी केली, परंतु हा फॉर्म त्यांच्याकडे नव्हता. त्यामुळे, कायद्याचं पालन करत हॉटेल्सनं या कुटुंबाला रुम देण्याचं नाकारलं.
६ तारखेला कराचीहून थार एक्सप्रेसनं जोधपूरला दाखल झालेलं हे कुटुंब बुधवारी दुपारी मुंबईत पोहचलं होतं. पण, पोलीस योग्य पद्धतीनं मदत करणार नाहीत, असं आपल्याला वाटलं त्यामुळे आपण पोलिसांकडे गेलो नाहीत, असं या कुटुंबाचं म्हणणं आहे.
अखेर, स्टेशनवरच रात्र काढावी लागणाऱ्या या कुटुंबाला रेल्वे पोलिसांनी मदत केली... आणि त्यांना रेल्वे स्टेशनच्या आराम कक्षात बसण्याची परवानगीदेखील दिली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.