अधिवेशनातून काही निष्पन्न होईल?

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सरकारचा कारभार रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना आता सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात आदर्श घोटाळा, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यातील भूखंड घोटाळ्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.

Updated: Jul 7, 2012, 10:44 PM IST

www.24taas.com, मुंबई 

मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सरकारचा कारभार रुळावर आणण्याचा प्रयत्न करत असताना आता सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी  अधिवेशन  सुरू होत आहे. या अधिवेशनात आदर्श घोटाळा, मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे आणि राज्यातील भूखंड घोटाळ्यावरून विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची चिन्हं आहेत.

पावसाळी अधिवेशनाला सामोरं जाताना सरकारसमोर यावेळी विरोधकांचे कडवे आव्हान असणार आहे. या पावसाळी अधिवेशनात विविध मुद्यांवर विरोधक सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

विरोधकांचे काही मुद्दे -

- मंत्रालयाला लागलेली आग आटोक्यात आणण्यास आलेलं अपयश

- आदर्श घोटाळा प्रकरणामुळे सरकारची झालेली बदनामी

- पाटबंधारे प्रकल्पांचा अनपेक्षित वाढलेला खर्च

- जलसंपदा मंत्री सुनील तटकरेंवर झालेले जमीन घोटाळ्याचे आरोप

- सिंचनाची श्वेतपत्रिका काढण्याची मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा

- राज्यातील दुष्काळाची स्थिती आणि लांबलेला पाऊस

- शेतकऱ्यांना सहकारी बँकांकडून पिक कर्ज मिळण्यात येत असलेल्या अडचणी

- कोकणातील अनधिकृत खनिज उत्खनन

अशा विविध मुद्यांवर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करणार आहेत. विरोधकांचा हा हल्ला परतवण्याची सरकारनेही तयारी सुरू केली आहे. मात्र मंत्रालयाला लागलेल्या आगीमुळे सरकारसमोर बऱ्याच अडचणी असणार आहेत. त्यामुळेच विरोधकांच्या हल्ल्याला तोंड देताना आगीचे कारण पुढे करून सरकार बचावात्मक पावित्र्यात असणार आहे. कर्नाटक सरकारने बेळगाव महापालिका बरखास्त केल्याप्रकरणाचा मुद्दाही या अधिवेशनात विरोधकांतर्फे उपस्थित केला जाणार आहे. कर्नाटकात भाजपाचे सरकार असूनही राज्यात विरोधी पक्षात असलेल्या भाजपा पक्ष बेळगावातील मराठी भाषिकांच्या बाजूने उभा राहणार आहे.