आजपासून टोल भरू नका, राज ठाकरेंचं आवाहन

नागरिकांनी आजपासून टोल भरणं बंद करावा, यापुढे कुणीही टोल भरू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना केलंय. आता नागरिकांच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी मनसे कार्यकर्ते टोल नाक्यांवर उभे राहणार असल्याचंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय.

Updated: Jul 24, 2012, 12:01 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

नागरिकांनी आजपासून टोल भरणं बंद करावा, यापुढे कुणीही टोल भरू नये, असं आवाहन राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना केलंय. टोल वसुलीबाबत सरकारनं पारदर्शकता आणेपर्यंत टोल न भरण्याचा आदेशच आता राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलाय. यामुळे आता नागरिकांच्या मदतीसाठी आणि संरक्षणासाठी मनसे कार्यकर्ते टोल नाक्यांवर उभे राहणार असल्याचंही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलंय.

 

टोल आंदोलनानंतर मनसेकडून तब्बल १४ दिवस टोल नाक्यांची पाहणी केली गेली. मुंबईत ३९ ठिकाणी सुमारे १० हजार कार्यकर्त्यांनी ही पाहणी केली. यावेळी अनेक धक्कादायक निष्कर्ष हाती आल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. टोलच्या नावाखाली सरकारकडून जनतेची लूट सुरू आहे. टोल वसुलीत पारदर्शकता नाही. याबाबत सरकारकडे विचारणा केली असता सरकारकडून माहिती मिळाली नाही, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यावर टोलचा पैसा जातो कुठे?, असा सवाल राज ठाकरे यांनी सरकारला केलाय.

 

धक्कादायक बाब म्हणजे, टोलवसुली करून सरकारनं मिळवलेला पैसा हा शिक्षकांच्या पगारावर खर्च केल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केलाय. आत्तापर्यंत सरकारनं केलेल्या टोलवसुलीचा हिशोब लागेपर्यंत आणि यासर्व कारभारात पारदर्शकता येईपर्यंत महराष्ट्रातल्या तमाम नागरिकांनी आजपासून टोल भरणं बंद करावा असं आवाहन राज ठाकरेंनी जनतेला केलंय. यापुढे टोल नाक्यांवर मनसैनिकांचीही उपस्थिती असेल. . नागरिकांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी मनसे कार्यकर्ते टोल नाक्यांवर उभे राहणार आहेत. नागरिकांना न जुमानणाऱ्या आणि जबरदस्तीनं टोल वसुली करणाऱ्यांकडे हे कार्यकर्ते लक्ष ठेऊन असतील. सोबतच कायदेशीर लढाईही लढली जाईल, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलंय.