आता टोलवाटोलवीचाही ‘आदर्श’?

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात नेत्यांची टोलवाटोलवी सुरुच आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या साक्षीत आज पुन्हा हेच समोर आलं. अशोक चव्हाणांनी या प्रकरणात विलासरावांकडे बोट दाखवले आहे.

Updated: Jun 30, 2012, 04:21 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

आदर्श सोसायटी घोटाळा प्रकरणात नेत्यांची टोलवाटोलवी सुरुच आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांच्या साक्षीत आज पुन्हा हेच समोर आलं.  अशोक चव्हाणांनी या प्रकरणात विलासरावांकडे बोट दाखवले आहे. मुंबई, पुणे यातील जमीन वाटपाचे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या कक्षेत येतात, ते महसूलमंत्र्यांच्या कक्षेत येत नसल्याचं सांगत, त्यांनी याप्रकरणात हात झटकले आहेत.

 

आदर्शच्या जमिनीचे वाटप आपण केलेलेच नसल्याचा दावाही अशोकरावांनी केलाय. सर्व्हे नंबर आणि प्रॉपर्टी कार्ड याबाबत काहीही माहिती नसल्याचा दावाही त्यांनी केलाय. २ जून २००० रोजी कन्हैय्यालाल गिडवाणी आणि इतर काही जण यासंदर्भात आपल्ल्याला भेटल्याचं त्यांनी मान्य केलंय. मात्र, रोज अनेक फाईल्स येत असतात त्यामुळे प्रत्येक फाईल आणि पान हाताळणं शक्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय. आजची चौकशी आयोगाची सुनावणी पूर्ण झाली असून, आता सोमवारी पुन्हा अशोक चव्हाणांची साक्ष होणार आहे.

 

आत्तापर्यंत, महाराष्ट्राच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांची आदर्श चौकशी आयोगासमोर साक्ष झालीय. यामध्ये माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी या प्रकरणी हात झटकत विलासरावांकडे बोट दाखवलं.  तर विलासरावांनी तत्कालीन महसूलमंत्री अशोक चव्हाण यांना याप्रकरणाला जबाबदार धरलं. तर आज झालेल्या साक्षीत अशोक चव्हाणांनी पुन्हा एकदा विलासरावच याला जबाबदार असल्याचं सांगत, चेंडू पुन्हा विलासरावांकडे टोलवलाय. दरम्यान, आदर्श प्रकरणी मी निर्दोष आहे, असा दावा जयंत पाटलांनी केलाय. तसंच विलासरावांना या प्रकरणात आपल्याला ओढलेलं नाही, तर त्यांनी फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत, असंही ते म्हणालेत.