शिवसेनेतील बंडखोर

Last Updated: Wednesday, February 1, 2012 - 22:26

www.24taas.com, मुंबई

 

एकेकाळी शिवसेनेत बंडाला स्थान नव्हतं. पण आता काळाबरोबरच शिवसेनाही बदलली आहे. शिवसेनेलाही आता बंडखोरीची लागण झाली आहे. बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेनं उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मचं वाटप करण्याची रणनीती आवलंबली होती. पण काही ठिकाणी बंडखोरी झालीच. शिवसेनेसाठी प्रतिष्ठेच्या अशा शिवाजी पार्क परिसरातल्या वॉर्ड १८५ मध्ये बंड झालं आहे.

 

प्रवीण शेट्ये यांच्या उमेदवारीला विरोध करत संजय भरणकर आणि भरत राऊत यांनी बंडाचा झेंडा फडकावलाय. चंदनवाडीतल्या वॉर्ड क्रमांक २१८ मध्ये शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. शिवसेनेनं संपत ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात विद्यार्थी सेनेचे राजू काळे आणि माजी उपविभागप्रमुख सुनील देसाई यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. शिवसेना उपनेते राजा चौगुले  आणि संदीप नाईक यांनी पक्षा विरोधात बंड केलं आहे. मुंबईतून बंडखोरीचा पेटलेला हा वणवा ठाण्यातही पोहोचला आहे.. तिकीट न मिळाल्यामुळे ठाण्यातील काही इच्छुक उमेदवारांनी  बंडाच निशाण रोवलं आहे.

 

एकीकडं बंडाचा भडका उडाला असतांना दुसरीकडं मात्र शिवसेना नेत्यांकडून शिवसेने  बंडखोरी नसल्याचा दावा केला जात आहे. तसेच उमेदवारांची  यादी जाहीर न करणं हा पक्षाच्या रणनीतीचा भाग असल्याचं शिवसेना नेत्यांनी सांगितलं आहे. शिवसेनेचे नगरसेवक  मंगेश सातमकरांनी बंडाचा पवित्रा घेतला होता. मात्र नेत्यांनी त्यांची समजूत काढण्यात यश मिळवलं आहे. तीन तारखेला अर्ज मागं घ्यायची शेवटची मुदत आहे. त्यानंतरच कुणाचं बंड टिकलं आणि कुणाचं बंड थंड होणार  हे उघड होईल.First Published: Wednesday, February 1, 2012 - 22:26


comments powered by Disqus