अरे बापरे, वृद्ध महिला पाच वेळा गर्भवती?

भ्रष्टाचार करताना लोक पैशासाठी इतके कोणत्याही थराला जाऊ शकतात याचं जीवंत उदाहरण उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडले. जननी सुरक्षा योजना भ्रष्टाचार करताना ६० वर्षांच्या म्हातारीला १० महिन्यांत ५ वेळा गरोदर दाखविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील असे अनेक विचित्र प्रकार चौकशीत पुढे येत आहेत. 

Updated: Jul 3, 2015, 07:57 PM IST
अरे बापरे, वृद्ध महिला पाच वेळा गर्भवती? title=

बरेली : भ्रष्टाचार करताना लोक पैशासाठी इतके कोणत्याही थराला जाऊ शकतात याचं जीवंत उदाहरण उत्तर प्रदेशातील बरेली येथे घडले. जननी सुरक्षा योजना भ्रष्टाचार करताना ६० वर्षांच्या म्हातारीला १० महिन्यांत ५ वेळा गरोदर दाखविल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील असे अनेक विचित्र प्रकार चौकशीत पुढे येत आहेत. 

योजनेत काळेबेरे असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे. त्यात आश्चर्यकारक घटना उघड होत आहेत. एक महिला चार महिन्यांत तब्बल तीन वेळा गरोदर राहिल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले आहे, तर एक ६० वर्षांची वृद्ध महिला १० महिन्यांत ५ वेळा गरोदर राहिल्याचे दाखवण्यात आले आहे. या सर्व नोंदीतून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

प्रसुती सुलभ व्हावी आणि माता आणि बालकाला पुरेसा आहार मिळावा यासाठी ही योजना २००५ मध्ये आणण्यात आली. गरीब मातांना त्यासाठी १४०० रूपये दिले जातात. मात्र, त्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीच हात धुवून घेतला आहे. 

किरकोळ पैशांची लालूच दाखवून प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी परिसरातील महिलांना जननी सुरक्षा योजनेंतर्गत मिळणाऱ्या पैशांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास सांगतात. मिळणाऱ्या पैशांतून हे कर्मचारी आपला 'हिस्सा' वाटून घेतात. 

बदायूँमधील आशादेवी ही महिला चार महिन्यांत तब्बल तीन वेळा जननी सुरक्षा योजनेंतर्गत मिळालेले धनादेश घेऊन बँकेत गेली. तेथील बँक अधिकाऱ्यांना त्यांचा संशय आल्यानंतर त्यांनी याबाबत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. त्यात अशा प्रकारची अनेक बोगस प्रकरणे समोर आली. 

या प्रकरणाशी संबंधित सार्वजनिक आरोग्य केंद्रांतील सर्व नोंदी आम्ही पाहिल्या आहेत. आता बँकांच्या अहवालाची वाट पाहत आहोत. यात दोषी असलेल्यांवर कडक कारवाई केली जाईल. असे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ. सुबोध शर्मा यांनी सांगितले आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.