ईश्वरचिठ्ठीने जिंकलेल्या अतुल शहांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत समान मते पडल्यानंतर भाजपच्या अतुल शहा यांना ईश्वरचिठ्ठीने साथ दिली असली तरी शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आता त्या पाच मतांसाठी कोर्टात धाव घेतायत. 

Updated: Feb 24, 2017, 05:53 PM IST
ईश्वरचिठ्ठीने जिंकलेल्या अतुल शहांच्या नगरसेवकपदावर टांगती तलवार title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत समान मते पडल्यानंतर भाजपच्या अतुल शहा यांना ईश्वरचिठ्ठीने साथ दिली असली तरी शिवसेनेचे सुरेंद्र बागलकर आता त्या पाच मतांसाठी कोर्टात धाव घेतायत. 

मुंबईतील वॉर्ड क्रमांक २२०मध्ये सुरेंद्र बागलकर आणि अतुल शहा यांना प्रत्येकी ५९४६ मते पडली होती. त्यावेळी एका छोट्या मुलीसमोर चिठ्ठी टाकून तीने एक चिठ्ठी काढली. त्यात अतुल शहा यांचे नाव आले.  

निवडणूक प्रक्रियेत याला टेंडर व्होट असं म्हंटलं जातं. बुथवरील उमेदवार प्रतिनिधीनं एखाद्या मतदाराबाबत आक्षेप घेतला आणि त्या मतदाराकडे मतदान करण्यापुरते पुरावे असल्यास, त्या मतदाराला मतपत्रिकेद्वारे मतदान करू दिलं जातं. म्हणजे त्याला ईव्हीएममध्ये बटण दाबून नव्हे, तर स्वतंत्र मतपत्रिका दिली जाते. परंतु हे मतदान मतमोजणीवेळी न मोजता कोर्टात उघडलं जातं.

प्रभाग क्रमांक 220 मध्ये अशी 5 टेंडर व्होट आहेत. ही मतं मोजण्यात यावीत, यासाठी सेनेचे सुरेंद्र बागलकर कोर्टाचं दार ठोठावणार आहेत. त्यामुळे भाजपचे अतुल शहा ईश्वरचिठ्ठीद्वारे नगरसेवक झाले असले, तरी त्या पाच टेंडर व्होटममध्ये काय होतं, यावर अतुल शहांच्या नगरसेवकपदाचा निर्णय अवलंबून असेल. याबाबत सुरेंद्र बागलकरांशी बातचित केलीय आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांनी.....