`ड्रिंक अॅन्ड ड्राइव्ह` नको... घ्या ‘पार्टी हार्ड ड्रायव्हर्स’ची मदत!

३१ डिसेंबर आता काही दिवसांवर आलाय. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झालीय. पार्टीमध्ये तुम्ही जर दारू पिणार असाल तर तुमची गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हर पुरविण्याचीही खबरदारी घेतली जातेय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 29, 2013, 10:04 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
३१ डिसेंबर आता काही दिवसांवर आलाय. याच पार्श्वभूमीवर मुंबईतल्या हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब या ठिकाणी जय्यत तयारी सुरू झालीय. पार्टीमध्ये तुम्ही जर दारू पिणार असाल तर तुमची गाडी चालविण्यासाठी ड्रायव्हर पुरविण्याचीही खबरदारी घेतली जातेय.
मुंबईमध्ये ३१ डिसेंबरची रात्र म्हणजे धिंगाणा, मस्ती आणि दारू... म्हणूनचं काही दिवसांवर आलेल्या ३१ डिसेंबरच्या नाईटसाठी रेस्टॉरंट्सने कंबर कसलीय. ठिकठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलं जातंय. यासाठी आता हॉटेल्सही सज्ज झालीत. हॉटेलमध्ये पार्टीसाठी आकर्षक पॅकेजेस तयार करण्यात आली आहेत. यामध्ये कुठे इंटरनॅशनल बॅन्ड, तर कुठे परदेशी खाद्य पदार्थांची मेजवाणी तयार करण्यात येणार आहे. याबरोबरच आता दारू पिल्यावर घरी सुरक्षित जाण्यासाठी ड्रायव्हरदेखील उपलब्ध करू दिले जाणार आहेत.
तुम्ही रात्रभर पार्टी करणार असाल पण घरी सुरक्षित पोहचाल का? अशी भीती वाटत असेल तर काळजी करू नका... कारण ‘पार्टी हार्ड ड्रायव्हर’ हे तुम्हाला घरी पोचविण्यासाठी तयार झालेत. ‘पार्टी हार्ड ड्रायव्हर’ ही एक अशी संस्था आहे जी तुम्हाला, तुम्ही दारू पिल्यानंतर तुमच्या गाडीसाठी ड्रायव्हर उपलब्ध करून देते. ३१ डिसेंबरच्या रात्रीसाठी ही सेवा रात्री १० वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, यासाठी तुम्हाला आठ तासांचे १५०० रुपये मोजावे लागणार आहेत, अशी माहिती पार्टी हार्ड ड्रायव्हरचे संचालक सौरभ शर्मा यांनी दिलीय.
दारू पिऊन गाडी चालविल्यामुळे आपघात होण्याची दाट शक्यता असते. वर्षाच्या पहिल्याच दिवशी कुणालाही तुमच्या बेजबाबदारपणामुळे जीव गमवावा लागू नये, एवढी काळजी तर नक्कीच प्रत्येकानंच घ्यायला हवी.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.