खडसे-दाऊद प्रकरणी हॅकरची उच्च न्यायालयात याचिका

खडसे-दाऊद संभाषण प्रकरणी, हॅकर मनिष भंगाळे याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

Updated: May 29, 2016, 10:08 PM IST
खडसे-दाऊद प्रकरणी हॅकरची उच्च न्यायालयात याचिका title=

मुंबई : खडसे-दाऊद संभाषण प्रकरणी, हॅकर मनिष भंगाळे याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 
 
दाऊद इब्राहिमच्या कराचीतील मोबाईल क्रमांकावर, महसूलमंत्री खडसे यांच्या मोबाईल क्रमांकावरून थेट कॉल गेल्याचं हे कथित प्रकरण आहे. 

याविषयी बडोद्याचा इथिकल हॅकर मनिष भंगाळे याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. 

'मी दिलेल्या माहितीतून समोर दिसून येत असलेल्या गुन्ह्याबद्दल कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. उलट काही लोक माझ्याकडील इलेक्‍ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा तसेच माझे ई-मेल्स डिलीट करण्याचा प्रयत्न करत आहेत', असे भंगाळेने म्हटले आहे.

सबळ इलेक्‍ट्रॉनिक पुरावे असतानाही मुंबई पोलिसांनी खडसेंविरूद्ध कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मनीष भंगाळे याने केला आहे. मनीषने १८ मे रोजी दाऊदच्या कराचीतील घराच्या दूरध्वनीचे कॉल डिटेल्स मुंबई पोलिसांना दिले आहेत. 

भंगाळे म्हणाला, 'देशहिताचा विचार करून मी माझे भविष्य, माझे कुटुंबिय आणि माझा स्वत:चा जीव पणाला लावून हे प्रकरण समोर आणले आहे'. भंगाळेच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

मुंबई पोलिसांनी खडसे यांना क्‍लिन चीट देण्यात घाई केल्याचेही तो म्हणाला. मुंबई उच्च न्यायालयाचा सध्या सुटीचा कालावधी आहे. मात्र आपल्या जीविताला धोका असून याप्रकरणी तातडीने सुनावणी करण्याची मागणीही मनीषने केली आहे.