वेश्यावृत्तीतून सोडवणाऱ्या पोलिसांनीच तीन महिने केला बलात्कार!

वेश्यावृत्तीतून सोडवणूक केलेल्या एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन पोलीसांनीच सलग तीन महिने बलात्कार केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, हे कृत्य कर्तव्यदक्ष मानल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबलनंच केलंय. 

Updated: Jun 26, 2015, 09:09 AM IST
वेश्यावृत्तीतून सोडवणाऱ्या पोलिसांनीच तीन महिने केला बलात्कार! title=

मुंबई : वेश्यावृत्तीतून सोडवणूक केलेल्या एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर दोन पोलीसांनीच सलग तीन महिने बलात्कार केल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, हे कृत्य कर्तव्यदक्ष मानल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या दोन कॉन्स्टेबलनंच केलंय. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पित्याच्या मृत्यूनंतर घरात कमावण्यासाठी आईचा एकमेव आधार ही मुलगी बनली होती. एका दाम्पत्यानं तिच्या आईची भेट घेत तिला आपल्यासोबत पाठवलं तर  नोकरी मिळवून देऊ, असं आश्वासन तिच्या आईला देत तिला आपल्यासोबत आणलं आणि या मुलीच्या दुर्दशेला सुरुवात झाली. 

या दाम्पत्यानं तिला जबरदस्तीनं वेश्याव्यवसायात ढकललं... आपलं शरीर दुसऱ्याच्या हवाली करण्यापलिकडे या मुलीकडे दुसरा कुठलाही पर्याय उरला नव्हता. 

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंब्रा पोलीस स्टेशननं केलेल्या कारवाईत या दाम्पत्याच्या वेश्याव्यवसायाचं रॅकेट पोलिसांनी पकडलं होतं. पण, त्यांच्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. मुलीच्या शरीराची लालूच दाखवून या दाम्पत्यानं पोलिसांना आपल्या बाजुनं वळवून घेतलं... पोलिसांनीही आरोपींना सोडून पीडित मुलीवर बलात्कार सुरू केला.  कौशल काकडे आणि इरफान खान असं या दोन पोलीस कॉन्स्टेबलची नावं आहेत.

३१ मार्च रोजी मानवी तस्करीविरुद्ध काम करणाऱ्या एका संघटनेनं या दाम्पत्याचा अजूनही वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना कळवली होती. पण, काहीच हालचाल झाली नाही. त्यामुळे या संघटनेनं पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर सुरू झालेल्या कारवाईत पोलिसांनी या प्रकरणात पहिली एफआयआर दाखल करून प्रकरणाची चौकशी सुरू केली... आणि त्यानंतर समोर जे काही आलं ते तितकंच धक्कादायक होतं.

मंगळवारी, पीडित अल्पवयीन मुलीनं आपली कहानी कोर्टासमोर कथन केली. तुरुंगात धाडण्याची धमकी देत आपल्यावर तब्बल तीन महिने कौशल आणि इरफाननं बलात्कार केल्याचं तिनं म्हटलंय. यानंतर, या दोघांना अटक करण्यात आलीय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.