मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना'तून मोदी सरकारचा समाचार!

मुसलमानांप्रमाणे अल्पसंख्यांक म्हणवून घेत जैन बांधव त्याच धर्मांध मार्गानं जाणार असतील तर 'देव त्यांचं भलं करो...' अशा तीव्र शब्दात मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आलीय. 

Updated: Sep 10, 2015, 12:52 PM IST
मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना'तून मोदी सरकारचा समाचार! title=

मुंबई : मुसलमानांप्रमाणे अल्पसंख्यांक म्हणवून घेत जैन बांधव त्याच धर्मांध मार्गानं जाणार असतील तर 'देव त्यांचं भलं करो...' अशा तीव्र शब्दात मांसबंदीच्या निर्णयावर 'सामना' या शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आलीय. 

जैन धर्मियांच्या पर्युषणाच्या निमित्तानं उद्यापासून 8 दिवस मीरा भाईंदरमध्ये मांस बंदीचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही बंदी दोन दिवसांवर आणण्यात आलीय खरी... पण, शिवसेनेनं अत्यंत तीव्र शब्दात जैन धर्मियांसाठी घेण्यात आलेल्या निर्णयावरून सरकारला आजच्या अग्रलेखातून झोडपून काढलंय.

अधिक वाचा - 'कुराण सांगतं बीफ खाल्ल्यानं होतात अनेक आजार', गुजरात सरकारची जाहिरात

पाहुयात काय म्हटलंय या अग्रलेखात...
'सामना'च्या अग्रलेखात 'जैनांनो, मुसलमानांच्या मार्गाने जाऊ नका!!' या मथळ्याखाली 'शाकाहारी आणि मांसाहारी हेदेखील एकाच हिंदू धर्माचे समाजघटक आहेत. असे असताना मांसाहारबंदीचा हा ‘जैन बाणा’ कशासाठी? तुम्हाला ‘हिंदू’ म्हणवून घ्यायला लाज वाटते काय? याचाही खुलासा मग यानिमित्ताने जैन बांधवांनी करायला हवा. तेव्हा जैन बांधवांनी हे फालतू प्रकार तत्काळ बंद करावेत हेच त्यांच्या हिताचे आहे... याआधीही जैनांची ‘पर्युषण’ पर्वं होतच होती; पण कत्तलखाने व मांसाहारबंदीची थेरं तेव्हा कुणाच्या डोक्यातून निघाली नव्हती. मग हे सर्व आताच हट्टाने का केले जात आहे? हीच धर्मांधता मुसलमानांच्या डोक्यात भिनली व तो हिंदू समाजाचा कायमचा शत्रू बनला. ‘पर्युषणा’च्या नावाखाली महाराष्ट्राला डिवचू नका. ‘जगा आणि जगू द्या’ याच मंत्राप्रमाणे ज्याला जे खायचे आहे त्याला ते खाऊ द्या. उगाच अहिंसेची धार्मिक लुडबूड करू नका!' असं म्हटलं गेलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.