मुंबईत भाजपसाठी 80 जागा सोडायला 'उदार' शिवसेना तयार!

गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मुंबई महापालिका निवडणूकीचे पघडम वाजायला लागलेत. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपशी युती करायला उत्सुक असल्याची चिन्हं आहेत. जागांच्या गणिताचा खेळ सुरू झालाय. भाजपला 80 जागा सोडण्यावर पहिली बोली लागलीय.

Updated: Sep 6, 2016, 09:00 PM IST
मुंबईत भाजपसाठी 80 जागा सोडायला 'उदार' शिवसेना तयार! title=

दिनेश दुखंडे, मुंबई : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर मुंबई महापालिका निवडणूकीचे पघडम वाजायला लागलेत. या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपशी युती करायला उत्सुक असल्याची चिन्हं आहेत. जागांच्या गणिताचा खेळ सुरू झालाय. भाजपला 80 जागा सोडण्यावर पहिली बोली लागलीय.

गेल्या विधानसभा निवडणूकीत जे शक्य झालं नाही.... केडीएमसी महापालिका निवडणुकीत जे करणं दोन्ही पक्षांनी टाळलं... ते मुंबई महापालिका निवडणुकीत घडणार का? 

मुंबई महापालिका निवडणुकीला आता अवघे पाच महिने उरलेत. ९ सप्टेंबरला वॉर्डांची पुनर्रचना जाहीर होतेय, तर ३ ऑक्टोबरला वॉर्डातल्या आरक्षणांची सोडत निघणार आहे. त्यामुळे साहाजिकच राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या व्यूहरचनेसाठी मोर्चेबांधणी सुरु झालीय. यंदाही  सगळ्यांचं लक्ष आहे शिवसेना भाजपमधल्या घडामोडींकडे... गेल्या विधानसभा निवडणुकीपासून बिघडलेले सूर महापालिकेसाठी पुन्हा जुळणार का? याबाबत उत्सुकता आहे. 

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा युती होण्यासाठी आग्रही आहेत. युती होण्यासाठी दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक स्तरावर चर्चाही सुरू झालीय. मुंबईच्या राजकीय सर्वेक्षण आणि पक्षातल्या धुरीणांसोबत केलेल्या सल्लामसलतीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला प्राथमिक स्तरावर 80 जागा सोडण्याची तयारी दर्शवलीय. हा आकडा वाटाघाटींनंतर 95 ते 100 पर्यंतही जाऊ शकतो. 

निवडणूक 2007

गेल्या काही निवडणुकांची राजकीय समीकरणं आणि आकडेवारी पाहिली तर... 2007 साली महापालिकेच्या एकूण 227 जागांपैकी शिवसेनेनं 158 जागा तर भाजपनं 69 जागा लढवल्या होत्या. त्यापैंकी शिवसेनेचे 84 आणि भाजपचे 28 नगरसेवक निवडून आले आणि  युतीची सत्ता स्थापन झाली. त्या निवडणुकीत शिवसेनेला 8,77,313 आणि भाजपला 3,35,664 मतं मिळाली होती. 

निवडणूक 2012

2012 साली झालेल्या महापालिका निवडणुकीत रामदास आठवलेंचा रिपाई हा नवा भिडू आल्यानं युतीची महायुती झाली होती. त्यावेळी शिवसेना 135, भाजप 63 आणि रिपाई 29 असा नवा फॉर्म्य़ुला अस्तित्वात आला. त्यावेळी शिवसेनेचे 75, भाजपचे 31 तर रिपाईचा 01 असे नगरसेवक निवडून येत महायुतीची सत्ता आली होती. शिवसेनेला 10,05683 आणि भाजपला 3,97,797 मते मिळाली होती. 

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटल्यानं मुंबईतली सगळी राजकीय समीकरणंच बदलून गेलीयत. या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे लढले त्यावेळी... भाजपचे 15 आणि शिवसेनेचे 14 आमदार निवडून आले. भाजपला 16, 84, 243 आणि शिवसेनेला 13,50,384 मते मिळाली...

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मुंबईत ताकद वाढल्यानं सहाजिकच भाजप आक्रमक झालीय. मुंबई महापालिका निवडणूकही स्वबळावर लढण्याची भूमिका प्रदेश पातळीवरच्या नेत्यांची आहे. तर भाजपकडून वारंवार मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे शिवसेनेमध्ये स्वबळावर निवडणूक लढावी, असा एक मतप्रवाह आहे. प्रसंगी राज ठाकरे यांच्या मनसेशी शिवसेनेनं युती करावी, असंही मत मांडलं जातंय. मात्र, या मतप्रवाहाला उद्धव ठाकरेंची संमती मिळणं सध्यातरी कठीण दिसतंय. 

उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचे ऐकमेकांशी अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. राज्यातली परिस्थिती पाहाता दोघांनाही एकमेकांच्या मदतीच्या राजकारणाचीच जास्त गरज आहे. मात्र, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात महापालिका निवडणुकीसाठी सुरू असलेलं गुफ्तगू भाजपच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींना रुचणार का हाही मुद्दा महत्त्वाचा आहे.