‘न’- नार्वेकरांचा, ‘न’- नाराजीचा आणि ‘न’- शिवसेनेतल्या नाट्याचा

शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी ज्यांच्यावर तोफ डागली ते उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर आहेत तरी कोण... असा प्रश्न अनेकांना पडला असेल... त्यांच्यासाठी खास..

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Dec 2, 2013, 09:11 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनेचे माजी खासदार मोहन रावले यांनी ज्यांच्यावर तोफ डागली ते उद्धव ठाकरेंचे पीए मिलिंद नार्वेकर आहेत तरी कोण... असा प्रश्न अनेकांना पडला असेल... त्यांच्यासाठी खास..
मिलिंद केशव नार्वेकर... शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पीए... शिवसेनेतलं एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व... सध्याच्या घडीला शिवसेनेतला खलनायक... भास्कर जाधव असो, नारायण राणे असो, अगदी राज ठाकरे असोत किंवा आजचे मोहन रावले असो, शिवसेनेतून बाहेर पडताना सर्वांचं टार्गेट एकच होतं... मिलिंद नार्वेकर... शिवसैनिकांनाच काय, अगदी वरिष्ठ नेत्यांनाही मिलिंद नार्वेकर हे नेमकं काय `रसायन` आहे, हे कळलेलं नाही...
मुळात मिलिंद हा साधा शिवसैनिक होता. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातला गटप्रमुख. १९९२च्या निवडणुकांआधी साधं शाखाप्रमुखपद मिळावं म्हणून तो मातोश्रीची पायरी चढला आणि मातोश्रीचाच झाला... हुशार, स्मार्ट, चुणचुणीत मिलिंद उद्धव ठाकरेंना भेटला. फक्त शाखाप्रमुख व्हायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे, असं उद्धवनी त्याला विचारलं. तेव्हा धोरणी मिलिंदनं `तुम्ही सांगाल ते...’असं पटकन उत्तर दिलं. आधी पडेल ती हलकी कामं त्यानं केली.
९२च्या महापालिका निवडणुकीनंतर शिवसेनेतलं उद्धव ठाकरेंचं महत्त्व वाढत गेलं. त्यांच्या अपॉईन्टमेंट घेणं, फोन घेणं, डायरी ठेवणं, दौरे आखणं, अशी कामं मिलिंदच्य गळ्यात पडली आणि तो उद्धव ठाकरेंची पीए बनला. दिलेली जबाबदारी निमूटपणं पार पाडणारा, कधीच कोणत्याही गोष्टीला नाही न बोलणारा मिलिंद उद्धवच्या गळ्यातला ताईत बनला..
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या स्वभावात जमीन-अस्मानाचा फरक होता. बाळासाहेबांना २४ तास लोकांना भेटायला आवडायचं. याउलट उद्धव मात्र घरात, कुटुंबात आणि आपल्या फोटोग्राफीच्या छंदात गुरफटलेले. त्यामुळं सामान्य शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना, आमदार-खासदारांना, अगदी बड्या नेत्यांसाठीही ते आऊट ऑफ रिच असायचे... अशावेळी भल्याभल्यांना कटवायचं काम मिलिंद लीलया पार पाडायचा..
अगदी शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यशैलीत बदल केला नाही... उद्धव ठाकरेंच्या अपॉईन्टमेंट पीए या नात्यानं मिलिंद नार्वेकरच ठरवत असल्यानं मिलिंदच्या विरोधातली धुसफूस वाढायला लागली. पण मिलिंदविरूद्ध उघड ब्र-उच्चारायची कुणाची धमक नव्हती...
२००४च्या निवडणुकीआधी भास्कर जाधवांनी शिवसेना सोडताना सर्वात आधी पीए मिलिंद नार्वेकरवर तोंडसुख घेतलं. मिलिंदकडून शिवसेनेत आर्थिक व्यवहार होत असल्याचा घणाघाती आरोप करत नारायण राणेंनी शिवसेना सोडली. त्यावेळचं वातावरण बघता मिलिंदची हकालपट्टी निश्चित मानली जात होती, परंतु आपणावरील हे गंडांतर टाळण्यात ते यशस्वी झाले. माझा विठ्ठल बडव्यांच्या चांडाळचौकटीत अडकला आहे, असं सांगत राज ठाकरेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केलं, तेव्हा त्यातला एक मिलिंदच होता... या सर्वांनी मिलिंद नार्वेकरला खलनायक म्हणून रंगवलं तरी शिवसेनेतील त्याची वट वाढतच गेली...
आता तर मिलिंदला आमदारकी-खासदारकी मिळणार इथपर्यंत चर्चा रंगू लागलीय... मिलिंदचं शिवसेनेतलं प्रस्थ वाढत चाललंय... मोहन रावले प्रकरणामुळं पुन्हा एकदा मिलिंद नार्वेकर हे नाव अधोरेखित झालंय... मोहन रावले हे देखील क्रिकेटपटू आहेत, तर मिलिंद नार्वेकर न्यू हिंद क्रिकेट क्लबचे अध्यक्ष... पण मोहन रावलेंना मिलिंदनंच कॉट अँड बोल्ड आऊट केलंय.. एवढं सगळं होऊनही मिलिंदचं मातोश्रीवरचं स्थान अढळ होतं आणि यापुढंही तसंच राहणार आहे...

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.