'युती'चं लग्न; २० वर्षांपूर्वीचं आणि आजचं!

 १९९५ साली पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचा भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकला. त्यानंतर २०१४ साली आधी भाजपचं आणि आता युतीचं सरकार सत्तेवर आलंय. याआधीच्या तुलनेत शुक्रवारच्या शपथविधी सोहळ्यात फारसा जल्लोष जाणवला नाही. 

Updated: Dec 7, 2014, 11:47 PM IST
'युती'चं लग्न; २० वर्षांपूर्वीचं आणि आजचं! title=

मुंबई :  १९९५ साली पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचा भगवा झेंडा महाराष्ट्रावर फडकला. त्यानंतर २०१४ साली आधी भाजपचं आणि आता युतीचं सरकार सत्तेवर आलंय. याआधीच्या तुलनेत शुक्रवारच्या शपथविधी सोहळ्यात फारसा जल्लोष जाणवला नाही. 

१४ मार्च १९९५ : जवळपास २० वर्षांपूर्वी तुतारीच्या आवाजात आणि जयघोषात पार पडलेला सेना नेत्यांचा शपथविधी आजही अनेकांच्या लक्षात असेल. १९९५ मध्ये महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं पहिलं बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आलं. महाराष्ट्रावर भगवा फडकवण्याचं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांचं स्वप्न साकार झालं. शिवाजी पार्कच्या मैदानात युती सरकारचा भव्यदिव्य, ऐतिहासिक, अभूतपूर्व असा हा शपथविधी सोहळा पार पडला. भगवे ध्वज, जयजयकाराच्या घोषणा, तुतारी, ढोल, ताशे, लेझीमचा नाद आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं अवघा आसमंत दुमदुमला होता. मनोहर जोशींनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. 

शपथविधीचा शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर त्याच व्यासपीठावर शिवसेना-भाजप युतीचा भव्य विजयी मेळावा पार पडला. युतीचं हे सरकार १९९९ पर्यंत टिकलं. 

३१ ऑक्टोबर २०१४ :  त्यानंतर तब्बल 15 वर्षानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर संपन्न झाला... राष्ट्रापाठोपाठ महाराष्ट्र जिंकणा-या भाजपच्या दहा मंत्र्यांनी या शाही सोहळ्यात शपथ घेतली.

भाजपचं सरकार पहिल्यांदाच सत्तेवर येत असल्यानं पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह बघतानाच जाणवत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपचे यच्चयावत नेते या सोहळ्याला उपस्थित होते. युती तुटल्यामुळं अर्थातच त्यावेळी शिवसेनेचा त्यात सहभाग नव्हता. भाजप आणि शिवसेनेतले संबंध त्यावेळी बिघडले होते. मात्र, भाजपच्या दिल्ली श्रेष्ठींनी फोन केल्यानंतर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वानखेडेवर उपस्थित राहिले. भाजपचा हा सोहळाही नेत्रदीपक असा होता. 

५ डिसेंबर २०१४ : त्या तुलनेत शुक्रवारी विधान भवनाच्या परिसरात पार पडलेला शपथविधी सोहळा अगदीच फिकाफिका होता. विशेष म्हणजे, शिवसेना पुन्हा एकदा सरकारमध्ये सामील होत असूनही, ना कुठे जल्लोष होता, ना आनंद होता, ना उत्साह... याआधीच्या शपथविधी सोहळ्यासारखी घोषणाबाजीही नव्हती.. केवळ औपचारिकता म्हणून शपथविधीचा कार्यक्रम होत असल्याचं प्रकर्षानं जाणवत होतं. पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह तमाम शिवसेना नेते याप्रसंगी उपस्थित होते. हस्तांदोलनाचे सोपस्कार होते, पण त्यात मैत्रीच्या नात्याची घट्ट वीण नव्हती. केवळ पाच कॅबिनेट आणि पाच राज्यमंत्रीपदं शिवसेनेच्या पदरात पडलीत. मात्र, कमी महत्त्वाची खाती देण्यात आल्यानं सामान्य शिवसैनिकांमध्ये नाराजीची भावना आहे. बळेबळेच लग्न लावून दिलेल्या दाम्पत्याच्या विवाह सोहळ्यासारखा हा कार्यक्रम पार पडला. आता हा जबरदस्तीचा विवाह किती काळ टिकतो? की पुन्हा घटस्फोटाची पाळी येते, याकडं आता महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.