अजितदादांनी केली सुप्रियाताईंना घोटाळ्यात मदत

पुण्याजवळ असलेल्या लवासा लेक सिटीची जमीन लिलाव न करता सुप्रिया सुळे यांच्या कंपनीला कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप माजी आयपीएस आधिकारी वाय. पी. सिंग यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Oct 18, 2012, 05:14 PM IST

www.24taas.com, मुंबई
पुण्याजवळ असलेल्या लवासा लेक सिटीची जमीन लिलाव न करता सुप्रिया सुळे यांच्या कंपनीला कवडीमोल भावाने दिल्याचा आरोप माजी आयपीएस आधिकारी वाय. पी. सिंग यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केला आहे. लेक सिटी कॉर्पोरेशनने तयार करण्यात आलेल्या या कंपनीला ३४८ एकर जमीन अजित पवारांनी दिल्याचा खुलासा केला आहे.
मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत वाय पी. सिंग यांनी हा जबरदस्त खुलासा केला आहे. लवासा लेक सिटीसाटी लेक सिटी कॉर्पोरेशनला ३४८ एकर जमीन २३ हजार रुपये प्रति महिना ३० वर्षांसाठी देण्यात आली आहे. जवळपास ही जमीन कवडीमोल किमतीलाच भाडेपट्ट्याने दिली आहे आणि यासाठी कोणताही लिलाव केला नाही. या संदर्भात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे अवमान करण्यात आल्याचेही यावेळी वाय. पी. सिंग यांनी सांगितले.
लेक सिटी कॉर्पोरेशनमध्ये शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुले आणि त्याचे जावई सदानंद सुळे यांचे शेअर्स होते. सुप्रिया सुळे यांचे १०.४ टक्के तर सदानंद सुळे यांचे १०.४ टक्के शेअर्स होते. नंतर हे शेअर्स त्यांनी विकल्याचेही सांगितले. या संदर्भात माझ्या बोलण्यावर नाही तर मी सादर केलेल्या पुराव्यांवरही भरोसा ठेवा असे वाय. पी. सिंग यांनी सांगितले आहे.
या संदर्भात मी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांना सर्व पुरावे दिले होते. परंतु, त्यांनी हे पुरावे दडवून गडकरींचा शुल्लक घोटाळा बाहेर काढला. गडकरींच्या घोटाळ्यापेक्षा पवार कुटुंबियांचा घोटाळा सर्वात मोठा असल्याचे वाय. पी. सिंग यांनी सांगितले.