स्मॉल वंडर : एका लिटरमध्ये १००० किमीचा टप्पा...

ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये एक हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकते. तसंच या कारचं वजन आहे फक्त २५ किलो.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Apr 4, 2013, 02:18 PM IST

www.24taas.com, अबुधाबी
होय, हे खरं आहे. एप्रिलचा महिना सुरू असेल तरी ही एप्रिल फूल करणारी बातमी नक्कीच नव्हे... संयुक्त अरब अमीरात (यूएई)मधल्या इंजिनिअरींगच्या एका विद्यार्थ्यानं एका नव्या कारची निर्मिती केलीय. या कारचं वेगळेपण ठसठशीतपणे दिसून येईल कारण ही कार एक लीटर पेट्रोलमध्ये एक हजार किलोमीटरचा टप्पा गाठू शकते. तसंच या कारचं वजन आहे फक्त २५ किलो.
न्यूज एजन्सी ‘डब्ल्युएएम’नं दिलेल्या माहितीनुसार अत्यंत कमी वजनाच्या या कारचं नाव आहे ‘ईको-दुबई’… या कारच्या निर्मितीचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. कारवर शेवटच्या टप्प्यातलं काम सुरू असलं तरी येत्या दोन आठवड्यांत त्याचं परीक्षण केलं जाणार आहे.
दुबई स्थित ‘हायर कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी दुबई मेन्स कॉलेज’चे विद्यार्थी गेल्या दोन वर्षांपासून या प्रोजेक्टवर काम करत होते. २५ किलोग्रॅम वजनाच्या या कारची लांबी दोन मीटर तर रुंदी अर्धा मीटर आहे.

ही कार येत्या जुलै महिन्यात जगभरातील यांसारख्याच कारच्या रेसमध्ये सहभागी होणार आहे. यामध्ये यूएईमध्ये बनलेल्या आणखी चार कारचादेखील समावेश आहे.
ही कार बनवणाऱ्या एका विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, पेट्रोल काही अनंत काळापर्यंत पुरणार नाही. एक वेळ अशी येईल की पेट्रोलचंच अस्तित्वच नाहीसं होईल. त्यामुळेच आम्ही इको-कार उदयोगाची सुरुवात केलीय.