अँड्रॉईड, आयओएसला आता टक्कर देणार जपानी ‘टायझेन’!

स्मार्टफोनच्या बाजारात आता चांगलीच स्पर्धा रंगतेय. याच स्पर्धेत आता नवा भिडू दाखल होतोय. गुगलच्या अँड्रॉईड आणि अॅटपलच्या आयओएसला टक्कर देण्यासाठी जपानच्या एका कंपनीनं `टायझेन` नावाची ऑपरेटिंग सिस्टिम आणण्याचं जाहीर केलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Jan 9, 2014, 09:44 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्मार्टफोनच्या बाजारात आता चांगलीच स्पर्धा रंगतेय. याच स्पर्धेत आता नवा भिडू दाखल होतोय. गुगलच्या अँड्रॉईड आणि अॅटपलच्या आयओएसला टक्कर देण्यासाठी जपानच्या एका कंपनीनं `टायझेन` नावाची ऑपरेटिंग सिस्टिम आणण्याचं जाहीर केलंय.
दिवसेंदिवस फोफावत चाललेल्या स्मार्टफोनच्या बाजारपेठेतील लढाई आता ऑपरेटिंग सिस्टिमवर येऊन ठेपली आहे. विशेष म्हणजे, सॅमसंग आणि एलजी या प्रसिद्ध स्मार्टफोन कंपन्यांसह जपान, चीन, दक्षिण कोरिया, युरोप आणि अमेरिकेतील अनेक मोबाईल कंपन्यांनी यासाठी एकी केली आहे. जपानमधील मोबाईल फोन सेवा कंपनी एनटीटी डोकोमोनं मार्च महिन्यापासून `टायझेन` आणण्याचं बुधवारी जाहीर केलंय.
`टायझेन`च्या निर्मितीमध्ये डोकोमोचा प्रमुख सहभाग असला तरी अमेरिकेतील इंटेल, दक्षिण कोरियातील सॅमसंग आणि एलजी, जपानची फुजित्सू, युरोपमधील व्होडाफोन, ऑरेंज आणि चीनची हुवेई या मोबाईल जगतातील नामांकीत कंपन्या यासाठी एकत्रित आल्या आहेत. सध्या आघाडीवर असलेल्या अँड्रॉईड आणि आयओएस या ऑपरेटिंग सिस्टिमना `टायझेन` नक्कीच मागं टाकेल, असा विश्वास या कंपन्यांनी व्यक्त केला आहे.
काय आहे टायझेन?
संगणकातील लिनक्स या ऑपरेटिंग सिस्टीमवर `टायझेन`ही मोबाईल ऑपरेटिंग सिस्टिम बसवण्यात आली आहे. ही `मुक्त स्त्रोत`(ओपन सोर्स) ऑपरेटिंग सिस्टिम असल्यानं त्यावर कोणा एका कंपनीची मालकी नसेल. यात तयार करण्यात आलेले अॅतप हे अँड्रॉईड, विंडोज आणि आयओएस अशा ऑपरेटिंग सिस्टिमवरही कोडिंगमध्ये थोडाफार फरक करून वापरता येणार आहे. हे अॅोप तयार करताना `एचटीएमएल ५`चा वापर करता येणार आहे. यापूर्वीच्या ऑपरेटिंग सिस्टिमवर अॅयप तयार करण्यासाठी `ऑब्जेक्टिव्ह सी` अशा तांत्रिक भाषांचा वापर करावा लागत असे.
राजकीय मुद्यांवरून एकमेकांच्या विरोधात असलेले जपान, चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया हे देशही या निमित्तानं एकाच व्यासपीठावर आले आहेत. ऑपरेटिंग सिस्टिमची बाजारपेठ सध्या अँड्रॉईड आणि आयओएस या ऑपरेटिंग सिस्टीम आघाडीवर आहेत. डिसेंबर २०१३च्या आकडेवारीनुसार जगभरात १४०कोटी स्मार्टफोनधारक असून यातील ७९कोटी ८० लाख हे अँड्रॉईड तर २९ कोटी ४० लाख हे आयफोन वापरकर्ते आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.