नावात आणि अभिनयातही 'आमिर'

मंदार मुकुंद पुरकर आमीर खानचा नुकताच वाढदिवस झाला. आमीरने नुकतचं ४७ व्या वर्षात पदार्पण केलं. कयामत से कयामत तक हा आमीरचा पहिलवहिला सिनेमा १९८८ साली प्रदर्शित झाला होता. सत्तरच्या दशकात जन्मलेल्या आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या माझ्या पिढीच्या डोळ्यात या रोमाँटिक शोकांतिकेने पाणी आणलं होतं. 'पापा कहते है बडा नाम करेगा' .... हे गाणं जणु माझ्या पिढीच्या आशा आकांक्षांचे शब्दरुप होतं.

Updated: Mar 19, 2012, 10:41 PM IST

 मंदार मुकुंद पुरकर

 

 

आमीर खानचा नुकताच वाढदिवस झाला. आमीरने नुकतचं ४७ व्या वर्षात पदार्पण केलं. कयामत से कयामत तक हा आमीरचा पहिलवहिला सिनेमा १९८८ साली प्रदर्शित झाला होता. सत्तरच्या दशकात जन्मलेल्या आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या माझ्या पिढीच्या डोळ्यात या रोमाँटिक शोकांतिकेने पाणी आणलं होतं. 'पापा कहते है बडा नाम करेगा' .... हे गाणं जणु माझ्या पिढीच्या आशा आकांक्षांचे शब्दरुप होतं. कॉलेजमधली प्रत्येक मुलगी जुही चावला वाटण्याचं ते दिवस होते. असो आता ते दिवस परत येणार नाहीत आणि तेव्हाच्या अनेक जुही आज आपआपल्या संसारात रमल्या असतील.

 

 

आमीरचा पहिलाच सिनेमा हिट झाला. त्याकाळी मुंबई टेरिटरीसाठी या सिनेमाचे हक्क अवघ्या चाळीस लाख रुपयांना विकण्यात आले होते. 'कयामत से कयामत तक'च्या पब्लिसीटीसाठी आमीरने स्वत: रस्त्यावर उतरुन रिक्षा-टॅक्सीना स्टिकर चिकटवले होते असं तुम्हाला सांगितलं तर आश्चर्याचा धक्का नक्कीच बसेल.

 

 

 

कयामत से नंतर आमीरचा आलेल्या राखची बॉक्सऑफिसवर राखसुद्धा शिल्लक राहिली नाही. पण या ऑफबीट सिनेमातील आमीरचा अभिनय तगडा होता. त्यानंतर काही टुकार सिनेमे आमीरने तडजोड म्हणून केले खरे पण त्यात त्याचा जीव रमला नाही. त्यानंतरच्या काळात अगदी मोजके आणि वर्षाला एकच सिनेमात काम करण्याचा निर्णय त्याने घेतला.

 

 

'दिल है कि मानता नही' मधला रघु जेटली आणि राजा हिंदुस्थानीतला राजा तसंच रंगीलामधला टपोरी मुन्ना प्रचंड भाव खाऊन गेला. पब्लिकने रंगीलाच्या वेळेस थिएटर डोक्यावर घेण्याचं काय ते बाकी ठेवलं होतं. महेश भटचा 'हम है राही प्यार के' असाच एक लक्षणीय सिनेमा. मनाला स्पर्शणारे अतिशय साधं सोपं कथानक आणि आमीर-जुहीचा नैसर्गिक अभिनयाने आजही हा सिनेमा ताजातवाना वाटतो. आमीर आपल्या कारखान्यात काम करणाऱ्या मुलींना सहकार्य करण्याची विनंती करतो तो सीन आठवून पाहा. आमीरने संयत अभिनयाचं दर्शन घडवत तो सीन विलक्षण उंचीवर नेऊन ठेवला आहे. आमीरने असचं आपल्या अभिनय सामर्थ्याचे दर्शन '१९४७ द अर्थ' या सिनेमात घडवलं आहे. फाळणीवर आधारीत असलेल्या या सिनेमात आमीरने व्यक्तीरेखेत होत जाणारे बदल अतिशय सुक्ष्मपणे टिपले आहेत.

 

 
आशुतोष गोवारीकर आणि आमीर खान यांनी प्रचंड जोखीम उचलत 'लगान'ची निर्मिती केली होती. लगानमध्ये ब्रिटीशकालीन ग्रामीण भारताचे चित्रण होते. ग्रामीण वेशभूषा, हिंदी भाषेचा वेगळा लहेजा अशा सर्व प्रकारचे प्रयोग करण्याचं धाडस या दोघांनी केलं. अर्थात मध्यंतरानंतरचा लगान फक्त दृष्यस्वरुपातचा वेगळा होता त्याचं रुपांतर टिपीकल बॉलिवूडपटात झालं होतं. त्यापाठोपाठ आलेल्या दिल चाहता है या सिनेमाने नव्वदच्या दशकात देशातील मेट्रो सिटीजमधल्या इलाईट क्लासच्या युवा वर्गाचे प्रातिनिधीक चित्रण होते. याचाच अर्थ आमीरने ऐशींच्या आणि नव्वदच्या दशकात तारुण्यात पदार्पण करणाऱ्या पिढीला भावतील अशा भूमिका साकारण्याचे आव्हान लीलया पेललं होतं. याचीच पुनरावृत्ती त्याने थ्री इडियटसमध्येही केली होती. तीन दशकातल्या प्रत्येक तरुण पिढीला आमीर आपला आयकॉन वाटतो हे विलक्षण नाही का.