नवरा-बायकोच्या रोजच्या सवयी उद्ध्वस्त करु शकतात, त्यांचे वैवाहिक जीवन

चाणक्य नीतीमध्ये नात्यांशी संबंधित देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे.

Updated: May 18, 2022, 08:56 PM IST
नवरा-बायकोच्या रोजच्या सवयी उद्ध्वस्त करु शकतात, त्यांचे वैवाहिक जीवन title=

मुंबई : आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टींचा किंवा घटनांचा संबंध चाणक्य नीतीशी जोडला गेला आहे. त्यामुळे बरेचसे असे लोक आहेत, जे आपल्या आयुष्यात कोणतंही संकट आलं किंवा कोणतेही प्रश्न उपस्थीत राहिले की, चाणक्या नीती वाचतात. आपल्याला एकीकडे चाणक्या नीती चांगल्या गोष्टींचे अनुकरण करायला सांगते, तर दुसरीकडे आपल्याला अशा काही गोष्टींपासून लांब राहण्याचा इशारा देते जे आपल्यासाठी हानिकारक आहेत.

यामधील शब्द लोकांना कडू वाटत असले तरी ते जीवनाचे सत्य सांगतात. चाणक्याने लिहिलेल्या नीतिशास्त्रात जीवनाच्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे. त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने त्यामध्ये सांगितलेल्या गोष्टींची काळजी घेतली, तर ते केवळ समस्या टाळू शकत नाही तर समाधानी आणि यशस्वी जीवन देखील जगू शकतात.

चाणक्य नीतीमध्ये नात्यांशी संबंधित देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे, त्याचा जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात आत्मसाद करण्याचा प्रयत्न केला तर, या पृथ्वीतलावर त्याच्यापेक्षा आनंदी कोणीही नाही.

पती-पत्नीमधील नाते हे खूप महत्त्वाचे आणि मजबूत असते, परंतु काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे पती-पत्नी एकमेकांपासून दुरावतात. मग अगदी त्यांचा प्रेम विवाह असला तरीही.

अशा परिस्थितीत पती-पत्नीने नाते घट्ट करण्यासाठी काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. या गोष्टी कोणत्या आहेत, याबाबत चाणाक्य नीतीमध्ये सांगण्यात आलं आहे. चला तर मग जाणून घेऊ या की त्या कोणत्या गोष्टी आहेत, ज्यामुळे व्यक्तीचं वैवाहिक जीवन उध्वस्त होऊ शकते.

एकमेकांवरील विश्वास ठेवा

विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. जर तुमचा तुमच्या जोडीदारावर विश्वास नसेल, तर याचा अर्थ तुमच्या नात्याची दोरी मजबूत नाही. जर पती-पत्नीमध्ये संशयाची भिंत आली तर याचा अर्थ तुमचे नाते तुटण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तुमच्या नात्यात कधीही शंका येऊ देऊ नका. असं कधी वाटत असेल तर थेट याबद्दल एकमेकांशी बोला आणि त्यावर तोडगा काढा.

एकमेकांवर शंका घेऊ नका

असं म्हणतात की शंका ही अशी गोष्ट आहे, जे कोणतंही नातं बिघडवू शकते. उद्धट व्यक्ती कोणाचेही ऐकत नाही, तो अनेकदा विचार करतो की तो जे विचार करतोय ते बरोबर आहे. त्यामुळे तुमच्या नात्यातील शंका दूर ठेवा आणि एकमेकांवर विश्वास ठेवा.

एकमेकांशी खोटे बोलू नका

जर पती-पत्नी एकमेकांशी काहीतरी लपवत असतील तर समजून घ्या की, त्यांच्या नात्यात आता पुढे जाण्यासारखे काहीही नाही. जर तुम्हाला कधी वाटत असेल की तुम्ही खरे बोलण्याचे धाडस करू शकत नाही, तर एकमेकांशी बोलून समस्या सोडवा आणि एकमेकांना मदत करण्याचा प्रयत्न करा.

एकमेकांचा अपमान करू नका

विवाह केवळ विश्वासावर किंवा प्रेमावर आधारित नसून एकमेकांच्या आदरावरही आधारित असतो. पती-पत्नीमध्ये एकमेकांबद्दल आदर नसेल तर तो नातं जास्त काळ टिकू शकत नाही. अशा स्थितीत नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पती-पत्नीने नात्याचा आदर केला पाहिजे.

चाणक्य नीती असे म्हणते की जर तुम्ही एखाद्याला आदर दिला तर तुम्हाला सन्मान नक्की मिळेल आणि यामुळे तुमच्या नात्यातील बंध आणखी घट्ट होतील.

एकमेकांवर रागावू नका

रागाचा अर्थ असा होतो की, रागाच्या भरात माणूस चांगले-वाईट सर्व विसरून कोणाशीही काहीही बोलतो. रागात बोललेले शब्द कधी कधी आयुष्यभर वेदना देतात. त्यामुळे पती-पत्नीने कधीही एकमेकांवर रागावू नये. कधी राग आला तर स्वतःवर नियंत्रण ठेवावं.

आपल्या नात्याबद्दल बाहेर कोणाला काही सांगू नका

पती-पत्नीने त्यांच्या वैयक्तिक गोष्टी बाहेरच्या लोकांना कधीही सांगू नयेत. मग तो व्यक्ती तुमच्या कितीही जवळ असला तरीही. आई-वडील किंवा आणखी कोणी कोणालाही तुमच्या नात्यातील गोष्टी सांगू नका किंवा कोणा तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका.

पती-पत्नीमध्ये वाद होण्यासाठी या गुपितांचा फायदा इतर कोणीही घेऊ शकतात. लक्षात ठेवा की तुमची वैयक्तिक रहस्ये बाहेरील कोणाला ही समजल्यामुळे तुमची प्रतिमा खराब होईल आणि असे झाल्यास तुमच्या नातेसंबंधांवर वाईट परिणाम होईल. त्यामुळे वैवाहिक जीवनातील गुप्त गोष्टी चूकूनही कोणाशी शेअर करू नका.