जिच्यासाठी धर्म बदलला तिलाच संपवलं, इतक्या विक्षिप्त अवस्थेत सापडला मृतदेह

Thane Crime : ठाण्याच्या मुंब्रा परिसरात माथेफिरु पतीने पत्नीची हत्या केली आहे. आरोपी पतीने सासू आणि मुलीवरही हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले आहे. दोघांवरही रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 29, 2023, 03:22 PM IST
जिच्यासाठी धर्म बदलला तिलाच संपवलं, इतक्या विक्षिप्त अवस्थेत सापडला मृतदेह title=

विशाल वैद्य, झी मीडिया, ठाणे : ठाण्याच्या (Thane Crime) मुंब्रा (Mumbra) भागात पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपी पतीने वेगळ्या राहणाऱ्या पत्नीची हातोड्याने हत्या केली आहे. यासोबत आरोपीने सासू आणि मुलीलावर हल्ला करत तिलाही जखमी केले आहेत. दोघांवर रुग्णालयात सध्या उपचार सुरु आहेत. पोलिसांनी (Thane Police) आरोपीला अटक केली आहे. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंब्रा येथील आंबेडकर नगरमध्ये पतीने पत्नीची हातोडीचे वार करून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून ही हत्या करण्यात आली आहे. मुंब्रा येथील आंबेडकर नगर येथे 30 वर्षीय जरीन अन्सारी ही महिला तिची मुलगी आणि एका मुलासह सासू आणि पती विजय उर्फ ​​समीर कमलनाथ मिश्रा यांच्यासोबत राहत होती. (पती धर्मांतर करून मुस्लिम झाला आहे). मात्र काही महिन्यांपूर्वी त्यांच्यात वाद झाल्याने सध्या तो भिवंडीत पत्नीपासून वेगळा राहत होता.

गुरुवारी अचानक तो पत्नीला भेटायला म्हणून आला. त्यावेळी रागाच्या भरात विजयने जरीनवर थेट हातोड्याने हल्ला केला. विजय जरीनवर हातोड्याने जोरदार प्रहार करत होता. जरीनला वाचवण्यासाठी आलेल्या सासू आणि मोठ्या मुलीवरही विजयने हल्ला केला. दुर्दैवाने जरीनचा या हल्ल्यात मृत्यू झाला तर जखमी झालेल्या त्याची सासू आणि मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान, शेजारी राहणाऱ्या प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विजय उर्फ ​​समीर हा घरच्यांना वाचवण्यासाठी आलेल्या शेजाऱ्यांना बॉम्ब सारखी गोष्ट दाखवून स्फोट घडवून आणायची धमकी देत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याबाबत पुढील तपास सध्या मुंब्रा पोलीस करत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितले?

"माझ्या घरासमोर हा सगळा प्रकार घडला. त्या घरामध्ये महिला, तिची दोन मुलं आणि आई या घरामध्ये राहत होते. दोन महिन्यांपासून इथे राहायला आल्यानंतर तिचा पती इथे फेरी मारत होता. यापूर्वीही महिलेच्या पतीने हातोथीडे हल्ला केला होता. घरात झोपेलेलो असताना अचानक खोलीतून ओरडण्याचा आवाज आला. दरवाजा उघडल्यानंतर आतमध्ये आरोपीच्या हातात हाथोडा आणि बॉम्बसदृश्य वस्तू होती. आरोपीने मी हा बॉम्ब फोडेन आणि तुलाही मारुन टाकेन असे सांगितले. त्यानंतर आरोपी पत्नीला आणि सासूला मारायला लागला. मला सगळ्यांना मारायचं आहे. मला हे जीवंत नकोत असे तो ओरडत होता. त्यानंतर आरोपीने दरवाजा बंद करुन हातोडीने पुन्हा मारायला सुरुवात केली," असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.