तुमची मुलं सुरक्षित आहेत ना? मन विचलित करणारी आणि चिंता वाढवणारी बातमी

Thane Crime News : ठाण्यात वर्षभरात बालकांवरील अत्याच्यारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. जिल्हा प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीवरुन ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Updated: Feb 16, 2024, 08:57 AM IST
तुमची मुलं सुरक्षित आहेत ना? मन विचलित करणारी आणि चिंता वाढवणारी बातमी title=

Thane Crime : देशभरासह राज्यात गेल्या काही महिन्यांपासून बाललैंगिक अत्याचाराच्या बातम्या सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे देशात बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढत असताना दिसत आहे. अशातच गेल्या वर्षभरात ठाणे जिल्ह्यातून बाल अत्याचारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ठाण्याच्या हद्दीत महिलांवर झालेल्या अत्याचारांच्या घटनांची संख्या चिंताजनक असतानाच आता जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या वार्षिक सांख्यिकी अहवालातून धक्कादायक माहिती पुढे आली आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 355 अल्पवयीन मुलांचे लैंगिक अत्याचार, तर 1,397 बालकांचे अपहरण झाल्याची माहिती उघडकीस आली.

ठाणे जिल्हा प्रशासनातर्फे महिला आणि बालकांवरील वर्षभरात झालेल्या अत्याचारांची नोंद घेण्यात येते. तसेच ठाण्यातील ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्यांचा अहवाल जिल्हा प्रशासन तयार करते. बालकांवरील अत्याचार थांबविण्यासाठी तसेच अल्पवयीन बालकांवरील अत्याचाराच्या घटनांनंतर त्यांच्या पुनर्वसनासाठी जिल्हा महिला बालविकास विभाग काम करीत असल्याची माहिती जिल्हा महिला बालविकास विभागाने दिली.

ठाण्यात कोरोनाकाळात अल्पवयीन मुले गुन्हेगारीच्या विळख्यात सापडल्याचे समोर आलं आहे. काही बालगृहांमध्ये अल्पवयीन मुलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर वर्षभरात जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक महिलांवर लैंगिक अत्याचार, मारहाण, हुंडाबळी तसेच अनैतिक धंद्यात जबरदस्तीने ढकलल्याच्या गंभीर गुन्ह्यांची नोंद झाल्याचे स्पष्ट झाले. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण, नवी मुंबई, आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत सर्व गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात वर्षभरात 11 बालकांची हत्या झाल्याचे समोर आलं आहे. तर 355 बाल लैंगिक अत्याचार 1,397 अपहरण, 244 मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

दरम्यान, निराधार अल्पवयीन बालकांवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार झाल्यास त्यांना जिल्हा महिला बाल विकास विभागाच्या अखत्यारीतील बालगृहात देखरेखीखाली ठेवण्यात येते. मात्र सध्या जिल्ह्यात बालगृहांची संख्याही कमी असल्याचे अनेकदा समोर आले आहे.