कर्ज काढण्यासाठी बँकेत थेट 'मृतदेह' घेऊन पोहोचली महिला, कर्मचाऱ्यांसमोर त्याच्याशी गप्पाही मारल्या; मग...

कर्ज घेण्यासाठी एक महिला बँकेत चक्क मृतदेह घेऊन पोहोचली होती. तो जिवंत आहे असं भासवत महिलेने चक्क त्याच्या नावे कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर ती बँक कर्मचाऱ्यांसमोर मृतदेहाशी गप्पा मारत होती.   

शिवराज यादव | Updated: Apr 17, 2024, 05:37 PM IST
कर्ज काढण्यासाठी बँकेत थेट 'मृतदेह' घेऊन पोहोचली महिला, कर्मचाऱ्यांसमोर त्याच्याशी गप्पाही मारल्या; मग... title=

बँकेतून कर्ज घेण्याची गरज प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधीतरी भासत असते. पण हे कर्ज घेताना त्यातून काही पळवाट काढता येते का असा काहींचा प्रयत्न असतो. दरम्यान अशाच एका प्रकरणात एक महिला चक्क मृतदेह घेऊन बँकेत पोहोचली होती. इतकंच नाही तर त्याच्याकडून आपल्या नावे कर्ज मिळवण्याचा प्रयत्नही तिने केला. बँक कर्मचाऱ्यांनाही त्याची स्थिती पाहून काही वेळासाठी शंका आली होती. याचा रंग का बदलला आहे? अशी विचारणाही कर्मचाऱ्यांनी केली. ब्राझिलमध्ये हा प्रकार घडला आहे. 

बँकेत मृतदेह आणल्यानंतर महिला त्याच्याशी गप्पा मारत होती. मृतदेहाचं डोकं वारंवार खाली पडत असल्याने ती ते पकडून उभी राहिली होती. तसंच 'अंकल तुम्ही ऐकताय का? तुम्हाला यावर स्वाक्षरी करायचा आहे. मी तुमच्यासाठी सही करु शकत नाही,' असं मृतदेहाला सांगत होती. बँक कर्मचाऱ्यांना शंका आल्याने त्यांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. तसंच नंतर रुग्णवाहिका आणि पोलिसांना फोन केला. 

व्हिडीओत महिला मृत व्यक्तीला पेन व्यवस्थित पकडण्यास आणि कागदावर सही करण्यास सांगताना दिसत आहे. यावेळी तिने पेन उचलून मृत व्यक्तीच्या हातात ठेवला होता. यावेळी उपस्थित असणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याने महिलेला सांगितलं की, 'हे कायदेशीर नाही. त्याची प्रकृती चांगली दिसत नाही. तो फार थकला आहे आणि रंगही बदलला आहे'.

यावर तिने उत्तर दिलं की, 'हा आधीपासूनच असा आहे'. यानंत तिने मृत व्यक्तीकडे पाहून म्हटलं की, 'जर तुमची प्रकृती नीट नसेल तर मी तुम्हाला रुग्णालयात नेते. तुम्हाला मी पुन्हा रुग्णालयात नेऊ का?'. व्हिडीओत मृत व्यक्तीचं डोकं वारंवार मागे पडताना दिसत आहे. यावेळी महिला त्याला इथे स्वाक्षरी करा, सारखा मला त्रास देऊ नको असं दरडावताना दिसत आहे. 

दरम्यान डॉक्टरांनी तपासणी केली असता 68 वर्षीय पॉलो रॉबर्टो यांचा काही तासांपूर्वी मृत्यू झाल्याचं सांगितलं. यानंतर महिलेला घटनास्थळावरुन अटक करण्यात आली आहे. आपण त्याचे नातेवाईक असल्याचाही महिलेचा दावा आहे. अधिकारी बँकेच्या आतील आणि बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरे तपासत आहेत. हा एखादा मोठा घोटाळा आहे का याचाही तपास करत आहेत. 

मृत्यूचं कारण समजून घेण्यासाठी शवविच्छेदन केलं जात आहे. पोलिसांनीही बँकेत आणण्याआधी व्यक्तीचा मृत्यू झाला होता याला दुजोरा दिला आहे. दरम्यान मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांची माहिती मिळवली जात आहे. कर्जासाठी अर्ज केला तेव्हा तो जिवंत होता का याचीही माहिती मिळवली जात आहे.