दैव बलवत्तर म्हणून, इतक्या उलथापालथीतूनही 'तो' लहानगा कुटुंबापर्यंत पोहोचला...

.. साऱ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणणारे ते क्षण....   

Updated: Jan 10, 2022, 10:16 AM IST
दैव बलवत्तर म्हणून, इतक्या उलथापालथीतूनही 'तो' लहानगा कुटुंबापर्यंत पोहोचला...  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

काबुल : अफगाणिस्तानमध्ये काही महिन्यांपूर्वी तालिबानची सत्ता सुरु झाली. तालिबान सत्तेवर येताच अनेक अफगाणी नागरिकांनी देश सोडण्याचा निर्णय घेतला. काहींनी तर तात्काळ देश सोडलासुद्धा. (Afhghsnistan)

अफगाणिस्तानमध्ये ओढवलेली ती सर्व परिस्थिती  हादरवणारी होती. त्यातच काही दृश्य साऱ्या जगाला विचलीत करुन गेली. 

एका दृश्यानं तर अनेकांना परिस्थिती किती दाहक आहे याचं वास्तव दाखवून दिलं. 

जिथं अवघ्या दोन महिन्यांच्या सोहेल अहमदी याला काबुल विमानतळावरील गर्दीपासून वाचवण्यासाठी कुटुंबीयांकडून त्याला अमेरिकेच्या सैन्याकडे सोपवण्यात आलं होतं. 

संरक्षण भींतीवर असणाऱ्या तारांवरून त्याला सैनिकांच्या हाती देण्यात आलं होतं. 

सोहेलचं कुटुंब ज्यानंतर तिथून सुरक्षितपणे पुढे सरकलं तेव्हा मात्र त्यांना आपलं बाळ कुठे मिळेना. 

अमेरिकेतील दुतावासामध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम पाहणारे त्याचे वडील मिर्झा अली अहमदी, बाळाची आई सुरैय्या आणि त्यांची इतर चार मुलं यांना अमेरिकेच्या दिशेनं जाणाऱ्या विमानात बसवण्यात आलं होतं. 

अनेक महिने त्यांना आपलं बाळ कुठे आहे याची काहीच कल्पना नव्हती. 

पुढे अशी माहिती मिळाली की सोहेल 29 वर्षी टॅक्सी चालक हामीद साफीच्या घरी सुरक्षित होता. 

वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार सोहेल विमानतळावरील  मैदानावर रडताना आढळून आला होता. त्याच्या कुटुंबाचा शोध घेऊनही हामीदला कोणीही सापडलं नाही. 

अखेर हामीदनं त्याला स्वत:च्या घरी नेत आपला मुलगा म्हणून त्याचा सांभाळ केला. त्याला मोहम्मद अबेद असं नावही देण्यात आलं. 

साफी यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर त्याच्यासह आपल्या इतरही मुलांचा फोटो पोस्ट केला. 

सोहलच्या अस्तित्वाबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याचे आजोबा मोहम्मद कसीन राझवी हे बादखस्तानहून दुरचा प्रवास करत काबुलला आले आणि त्यांनी सोहेलला परत देण्याची विनंती साफी यांच्याकडे केली. 

सूत्रांच्या माहितीनुसार साफीनं हे बाळ परतवण्यास नकार देत त्याला आणि त्याच्या कुटुंबालाही अमेरिकेत स्थलांतरीत करावं अशी मागणी केली. 


छाया सौजन्य- रॉयटर्स/ लहानगा सोहेल आणि त्याचे आजोबा 

जवळपास सात आठवड्यांच्या सल्लामसलतीनंतर साफीकडून तालिबान पोलिसांनी दोन्ही कुटुंबामध्ये सामंजस्यानं मध्यस्ती घातली आणि अखेर शनिवारी सोहेलला त्याच्या आजोबांकडे सोपलण्यात आलं. 

सोहेलला पुन्हा आपल्या कुटुंबासमवेत पाहून एकच आनंदाची लहर त्यावेळी पाहाय़ला मिळाली. आता लवकरच त्याला अमेरिकेतील मिशिगन येथे वास्तव्यास असणाऱ्या त्याच्या कुटुंबाकडे पाठवण्यात येणार आहे.