Apple Success Story | 198 देशांच्या GDP पेक्षाही ऍपलची मार्केट वॅल्यू जास्त

4 जानेवारी 2022 रोजी Apple ही जगातील पहिली कंपनी बनली, जिने तीन ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 224 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप ओलांडले. ऍपलचे मूल्य भारतासह 198 देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक झाले आहे.

Updated: Jan 6, 2022, 12:52 PM IST
Apple Success Story | 198 देशांच्या GDP पेक्षाही ऍपलची मार्केट वॅल्यू जास्त title=
Steve Wozniak & Steve Jobs

मुंबई : कोणत्याही मोठ्या कंपनीचे नाव घेतले की सर्वप्रथम त्या कंपनीच्या लोगोचे चित्र लोकांच्या मनात येते. कारण प्रत्येक कंपनीची ओळख त्या कंपनीच्या 'लोगो'वरून होते. प्रत्येक ब्रँडची ओळख म्हणजे त्याचा लोगो असतो. लोगोला कंपनीचे आयकॉन म्हटले जाते. त्यापैकीच एक म्हणजे 'ऍपल' कंपनी होय. (Apple Success Story in marathi)

ऍपल कंपनीचे नाव घेताच त्याच्या लोगोचे म्हणजेच कापलेल्या सफरचंदाचे चित्र मनात येते. 4 जानेवारी 2022 रोजी Apple ही जगातील पहिली कंपनी बनली, जिने तीन ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 224 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप ओलांडले. ऍपलचे मूल्य भारतासह 198 देशांच्या जीडीपीपेक्षा अधिक झाले आहे.

अमेरिकन कंपनी Apple ची स्थापना 1 एप्रिल 1976 रोजी झाली. कंपनीची स्थापना स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोझ्नियाक आणि रोनाल्ड वेन यांनी केली होती. सुरुवातीला त्यांचा उद्देश पर्सनल कंप्यूटर बनवणे हा होता. कंपनीच्या स्थापनेच्या एका वर्षानंतर 1977 मध्ये कंपनीचे नाव बदलून 'Apple Inc' करण्यात आले. तंत्रज्ञानासोबतच ऍपलची ओळखही वेळोवेळी बदलत गेली.

दरम्यान, 1976 मध्ये सुरू झालेल्या ऍपल कंपनीने ऑगस्ट 2018 मध्ये एक ट्रिलियन डॉलर्सचा टप्पा गाठला. दोन वर्षांनंतर म्हणजे ऑगस्ट 2020 मध्ये, कंपनीने दोन ट्रिलियन डॉलर मार्केट कॅप ओलांडली आणि अवघ्या 16 महिन्यांत (2022मध्ये) ती तीन ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचली.

एकेकाळी सहा रेफ्रिजरेटर्सच्या बरोबरीचा एक संगणक असायचा. स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझ्नियाक या दोन मित्रांना असा संगणक बनवायचा होता. जो लोक त्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सहज ठेवू शकतील.

दोघांनी असा संगणक बनवण्याचे काम सुरू केले. 1976 मध्ये त्यांना यश मिळाले. ऍपल-वन तयार झाला आणि 1 एप्रिल 1976 रोजी लॉन्च करण्यात आला तेव्हा त्यात ना मॉनिटर होता, ना कीबोर्ड, ना बॉक्स होता. 1978 मध्ये Apple-2 लाँच केल्याने संगणक उद्योगात क्रांती झाली. दोन वर्षांत कंपनीची विक्री $7 दशलक्ष वरून $117 दशलक्ष झाली.

1983 मध्ये स्टीव वोझ्नियाक यांनी कंपनी सोडली. तसेच 1985 मध्ये स्टीव जॉब्सदेखील कंपनीतून बाहेर पडले. नंतर कंपनीचे नेतृत्व जॉन स्कली यांनी केले.

1990 च्या दशकापर्यंत ऍपल कॉम्प्युटरने प्रचंड नफा कमावला. परंतू त्यानंतर कंपनीला उतरती कळा लागली ग्राहकांची मागणी कमी होत गेली आणि कंपनी बुडू लागली. 1997 मध्ये, बोर्ड सदस्यांनी स्टीव्ह जॉब्सला कंपनीत परत आणण्याचा निर्णय घेतला. हा एक टर्निंग पॉईंट ठरला आणि त्यानंतर ऍपलने मागे वळून पाहिले नाही.

स्टीव्ह जॉब्सने कॉम्प्युटरची विक्री वाढवली आणि iBook, iPod, MP3 प्लेयर आणि iPhone सारखी उत्पादने लाँच केली आणि मार्केट लीडर बनले.

जगातील पहिला iPhone 2007 मध्ये लाँच झाला होता

ब्रायन मर्चंटने 'द वन डिवाइस : द सीक्रेट आफ द आयफोन' नावाचे पुस्तक लिहिले आहे. त्यानुसार आयफोन बनवण्याची कल्पना फक्त स्टीव्ह जॉब्सलाच माहीत होती आणि त्यांनी ही पद्धत कोणाशीही शेअर केली नाही.

स्टीव्ह जॉब्सने या प्रकल्पाला 'प्रोजेक्ट पर्पल' असे नाव दिले. त्यासाठी क्युपर्टिनोमध्ये एक इमारत घेण्यात आली. या इमारतीच्या शेजारी राहणाऱ्या लोकांना त्यात काय चालले आहे हेही कळत नव्हते. प्रोजेक्ट पर्पलमध्ये सामील असलेल्या टीम सदस्यांना ते काम करत असलेल्या फायनल प्रोडक्टदेखील माहिती नव्हते.

3 वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर, जानेवारी 2007 रोजी, स्टीव्ह जॉब्सने सॅन फ्रान्सिस्कोमधील मॉस्कोन सेंटरमध्ये जगातील पहिला आयफोन लॉन्च केला. 

आयफोन लॉन्च झाल्यानंतर शेअर्सची वाढली किंमत

जानेवारी 2007 मध्ये आयफोन लाँच झाल्यापासून Apple च्या स्टॉकमध्ये 5,800 टक्के वाढ झाली आहे. 2018 मध्ये ऍपलचा 60 टक्के महसूल आयफोनमधून आला होता. जो आता 52 टक्क्यांवर आला आहे. 

2011 मध्ये टिक कुकने केले नेतृत्व

स्टीव्ह जॉब्सने ऑगस्ट 2011 मध्ये ऍपल कंपनीचा राजीनामा दिला आणि त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये कर्करोगाने त्यांचे निधन झाले. त्यानंतर टीम कुक कंपनीचे सीईओ झाले. 

कुकने 2015 मध्ये ऍपल वॉच, 2016 मध्ये एअरपॉड्स लॉन्च केले. 2018 मध्ये, कंपनीने प्रथमच $1 ट्रिलियन मार्केट कॅप ओलांडली. दोन वर्षांनी दोन ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला.

3 जानेवारी 2022 रोजी Apple $3 ट्रिलियनचे मार्केट कॅप मिळवणारी जगातील पहिली कंपनी बनली.

ऍपलचा आयकॉनिक लोगो

Appleच्या लोगोबद्दल अनेक वर्षांपासून ही कथा प्रचलित होती. अॅलन मॅथसिन हे ट्युरिंग नावाचे संगणक शास्त्रज्ञ होते, ज्यांनी जर्मन कोड ब्रेकिंग मशीन तयार केले होते. या यंत्राचे नाव 'ट्युरिंग मशीन' असे होते. सरकारने अॅलनवर अनेक अत्याचार केल्याचे सांगितले जाते. त्याचा मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळे अॅलनने आत्महत्या केली. त्याने सफरचंद सायनाइडमध्ये ठेवले आणि सकाळी उठून ते खाल्ले आणि उरलेले सफरचंद टेबलावर ठेवले. टेबलावर ठेवलेले सफरचंद अॅपलचाच लोगो बनला.

Apple सह-संस्थापक स्टीव्ह वोझ्नियाक यांनी त्यांच्या 2006 च्या पुस्तकात या कथेला निराधार म्हटले आणि Apple चे नाव आणि लोगोची खरी कहाणी सांगितली. पुस्तकानुसार, 'मी आणि जॉब्स हायवेवरून प्रवास करत होतो. तेव्हा आम्ही कंपनीच्या नावाबद्दल चर्चा करीत होतो. स्टीव्ह जॉब्स त्यावेळी ओरेगॉनहून येत होते ज्याला सफरचंद बाग म्हणतात. तो म्हणाला ऍपल कॉम्प्युटर कसा असेल? त्यानंतर यापेक्षा चांगले नाव आम्हाला सापडले नाही.

अॅपलचा पहिला लोगो रोनाल्ड वेनने डिझाइन केला होता. यावर स्टीव्ह जॉब्स खूश नव्हते आणि त्यांनी रॉब जॅनॉफला कामावर घेतले.

 ऍपलचा आयकॉनिक लोगो 1977 मध्ये दिसला, जो आजही सुरू आहे.