...म्हणून 23 कोटींची संपत्ती मुलांऐवजी चक्क कुत्र्या-मांजरांच्या नावावर केली; सारेच थक्क

Chinese Woman Leaves Rs 23 Crore To Her Cats And Dogs: या महिलेने पूर्वीच्या मृत्यूपत्रामध्ये तिची संपत्ती तिच्या मुलांच्या नावे केली होती. मात्र अगदी अंतिम क्षणी तिने आपले मृत्यूपत्र बदलले आणि संपत्ती कुत्र्या, मांजरांच्या नावावर केली. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 26, 2024, 03:37 PM IST
...म्हणून 23 कोटींची संपत्ती मुलांऐवजी चक्क कुत्र्या-मांजरांच्या नावावर केली; सारेच थक्क title=
महिलेच्या मृत्यूपत्रात पाळीव प्राण्यांच्या नावावर संपत्ती करत असल्याचा उल्लेख (प्रातिनिधिक फोटो)

Chinese Woman Leaves Rs 23 Crore To Her Cats And Dogs: संपत्तीवरुन भावंडामध्ये असलेला वाद, जमिनीच्या वाटपावरुन होणारे वाद, हाणामारी यासारख्या गोष्टींबद्दल तुम्ही यापूर्वी अनेकदा ऐकलं असेल किंवा वाचलं असेल. सामान्यपणे पालकांच्या संपत्तीवरुन आणि मृत्यूपत्रावरुन भावंडामध्ये वाद होतात. मात्र सद्या चीनमधील एका महिलेचं मृत्यूपत्र वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. या महिलेने तिच्या मालकीची 23 कोटींची संपत्ती तिच्या मुलांच्या नावे करण्याऐवजी पाळीव प्राण्यांच्या नावे केली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार या महिलेचं अडनाव लिऊ असं आहे. या महिलेच्या मुलांनी म्हतारपणामध्ये कधीच तिची भेट घेतली नाही. त्यामुळेच मृत्यूपूर्वी संतापून तिने सर्व संपत्ती आपल्या पाळीव प्राण्यांच्या नावे केली.

आधी मुलांच्या नावावर होती संपत्ती पण...

काही वर्षांपूर्वी या महिलेने तयार केलेल्या मृत्यूपत्रामध्ये तिच्या मालकीची 20 मिलियन युआन म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 23 कोटी रुपयांची संपत्ती तिच्या मुलांच्या नावावर केली होती. मात्र मृत्यूच्या आधी अगदी शेवटच्या काही महिन्यांमध्ये तिने आपलं मृत्यूपत्रामध्ये बदल केला. आपल्या मुलांना आपली काहीच काळजी नसून त्यांनी आपली कधीच विचारपूस केलेली नाही किंवा ते आपल्याला कधी भेटायलाही आले नाहीत या गोष्टीचा राग मनात धरुन महिलेने तिच्या संपत्तीमधून मुलांना बेदखल केलं. 

पैसा कुठे खर्च करावा हे ही सांगितलं

मुलं आपल्याकडे दूर्लक्ष करत असल्याचं समजल्यानंतर शांघाईमधील या महिलेने तिची संपत्ती तिच्या मांजरींच्या आणि कुत्र्यांच्या नावे केली आहे. माझ्यासोबत इतर कोणीही नव्हतं तेव्हा मला माझ्या पाळीव प्राण्यांनी साथ दिली. म्हणून मी संपत्ती त्यांच्या नावावर करत असल्याचं या महिलेने मृत्यूपत्रात नमूद केलं आहे. माझी सर्व संपत्ती या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी किंवा देखभालीसाठी खर्च केली जावे, असं या महिलेने म्हटलं आहे.  

संपत्तीवर देखरेख ठेवण्यासाठी केली विशेष नियुक्ती

चीनमधील नियमांनुसार लिऊला ही संपत्ती थेट प्राण्यांच्या नावे करता येणार नाही. त्यामुळेच प्राण्यांच्या एका स्थानिक दवाखान्याला या संपत्तीवर देखरेख करण्यासाठी नियुक्त करण्यात आलं आहे. "आम्ही  लिऊ यांना एखाद्या व्यक्तीला या पैशांवर देखरेख करण्यासाठी नियुक्त करावं असं सुचवलं होतं. मात्र प्राण्यांची काळजी घेण्यासंदर्भातील निर्णय प्राण्यांच्या दवाखान्याकडून अधिक उत्तमप्रकारे घेतला जाईल असं त्यांना वाटत होतं," असं चीनमधील मृत्यूपत्रांची नोंद करणाऱ्या बिजिंगमधील कार्यालयातील अधिकारी चेन काई यांनी सांगितलं. 

पर्याय खुला ठेवलेला

अन्य एका अधिकाऱ्याने लिऊ यांनी मुलांबरोबरचे वाद मिटवल्यास पुन्हा मृत्यूपत्र बदलण्याचा पर्याय खुला ठेवला होता अशी माहिती दिली. मात्र या महिलेच्या मृत्यूपर्यंत ना तिची मुलं तिला भेटायला आली ना त्यांचे वाद मिटले. त्यामुळेच या महिलेच्या मांजरी आणि कुत्रे 23 कोटींच्या संपत्तीचे मालक ठरले आहेत.