इराणमध्ये एका दिवसात कोरोनाचे ४९ बळी

भारतातील कोरोना बाधितांची संख्या ३९ वर

Updated: Mar 8, 2020, 06:14 PM IST
इराणमध्ये एका दिवसात कोरोनाचे ४९ बळी  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : जगभरात कोरोना व्हायरस झपाट्याने पसरतो आहे. ताज्या माहितीनुसार इराणमध्ये दिवसभरात कोरोनानं ४९ जणांचा बळी घेतला आहे. इटलीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झापाट्याने वाढत असून इटलीत आतापर्यंत २०० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चीननंतर इटलीत सर्वाधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. दरम्यान इटलीत सुमारे ६ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

चीनमध्ये आणखी २७ जणांचा कोरोना व्हायरसने मृत्यू झाल्याची माहिती एएफपीने दिलीय. त्यामुळे आता कोरोनाच्या चीनमधल्या बळींची संख्या ३,०९७ झाली आहे. तर केरळमध्येही कोरोनाचे पाच रुग्ण आढळून आलेत त्यामुळे भारतातही कोरोना बाधितांची संख्या आता ३९ वर गेली आहे. 

कोरोना व्हायरसमुळे इराणमध्ये एका दिवसात ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे इराणमध्ये कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आकडा आता १९४ इतका झाला आहे. विशेष म्हणजे २४ तासांत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनामुळे मृत्यू पावण्याची इराणमधली ही पहिलीच घटना आहे. कोरोनाचा उगम झालेल्या चीननंतर सर्वाधिक मृतांची संख्या सध्या इराणमध्ये आहे. इराणमधल्या सर्व ३१ प्रांतांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. तर ६ हजार ५६६ जणांना लागण झाली आहे. 

केरळात कोरोनाचे आणखी ५ रूग्ण आढळले आहेत. या रूग्णांची टेस्ट पॉझिटीव्ह असल्याचं आढळलंय. हे सर्व रूग्ण केरळच्या पथनामथिट्ट जिल्ह्यातले आहेत. यातले तीन जण इटलीतून २९ फेब्रुवारीला आले होते. तर उरलेले दोघे त्यांचे नातेवाईक आहेत. या सर्व पाचही जणांना आयसोलेट करण्यात आलंय. एका स्वतंत्र कक्षात त्यांना ठेवण्यात आलंय. पाचही रूग्णांवर उपचार सुरू आहेत. याआधीही केरळ्यातल्या तिघांना कोरोनाची लागण झाली होती. ते तिघेही वुहान इथे मेडीकल विद्यार्थी होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलंय.