कोरोना संकटात भारताला 'हा' देश करणार मदत, लस निर्मितीला येणार वेग !

 पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार

Updated: Apr 26, 2021, 11:04 AM IST
कोरोना संकटात भारताला 'हा' देश करणार मदत, लस निर्मितीला येणार वेग ! title=

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची (India Corona) दुसरी लाट आल्यानं आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली आहे. त्यामुळे लसीकरण (Vaccination) वेगानं व्हावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याचं जाहीर केलं आहे. मात्र लस निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल नसल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. अमेरिकेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे लस उत्पादनावर परिणाम झाला होता. 

त्यानंतर भारतानं वारंवार अमेरिकेकडे (America) कच्च्या मालाची मागणी केली होती. अखेर अमेरिकेनं भारताला लसी निर्मितीसाठी कच्चा माल देण्याचं मान्य केलं आहे. बायडेन प्रशासनाकडून भारताला ही माहिती देण्यात आली आहे. अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांनी भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ही माहिती दिली. त्यामुळे पुन्हा एकदा लस निर्मितीला जोर येणार आहे.

लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अद्यापही कच्च्या मालाचा पुरवठा होत नसल्याने अदर पुनावाला यांनी आता थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनाच हात जोडून विनंती केली होती. 

त्यानंतर अमेरिकेवर दबाव वाढू लागला होता. अखेर अमेरिकेना भारताची मागणी मान्य केली असून लवकरच लसी निर्मितीसाठी कच्चा मालाचा पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे लस निर्मितीची अडचण दूर होणार आहे.

सीरम इन्स्टिट्युटतर्फे Astrazeneca आणि Oxford यांच्यासोबत संयुक्तपणे Covishield लसीचं उत्पादन केलं जात आहे. सध्या महिन्याला ६ ते ६.५ कोटी डोसचं उत्पादन सीरमच्या पुण्यातील प्लांटमध्ये सुरू असून ते १० ते ११ कोटींपर्यंत नेण्याचं ध्येय या वर्षी जूनपर्यंत गाठण्याचा संकल्प अदर पूनावाला यांनी यावेळी बोलून दाखवला होता.

राज्यात दिवसभरात ८३२ रूग्णांचा मृत्यू , ६६ हजार १९१ करोनाबाधित वाढले

गेल्या वर्षी अमेरिकेत करोनाची भीषण लाट आली होती. तेव्हा भारताने हाय़ड्रॉस्किक्लोरिक्वीन भारतातून अमेरिकेला पाठवली होती. त्यावेळी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला विनंती केली होती. या विनंतीला मान देत भारताने तात्काळ गोळ्यांचा पुरवठा केला होता.

सौदी अरेबियाची मदत 

सौदी अरेबिया भारताला 80 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवतो. अदानी ग्रुप आणि लिंडे कंपनीच्या सहकार्याने हा ऑक्सिजन भारतात पाठवला गेला आहे.

रियाधमधील इंडियन मिशनने ट्विट केले आहे की, भारताची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी 80 मेट्रिक टन ऑक्सिजन पाठविण्यात अदानी ग्रुप आणि मेसर्स लिंडे यांच्यात झालेल्या सहकार्याचा भारतीय दूतावासाला अभिमान आहे. मदत, समर्थन आणि सहकार्याबद्दल सौदी अरेबियाच्या आरोग्य मंत्रालयाचे मनापासून आभार.

यासंदर्भात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी ट्विट केले, रियाधमधील भारतीय दूतावास यांना धन्यवाद. शब्दांपेक्षा अधिक काम बोलते. आम्ही सध्या जगभरातून ऑक्सिजन मिळवण्याच्या कामात गुंतलो आहोत. 80 टन ऑक्सिजनची पहिली खेप सध्या दमाम ते मुंद्रा दरम्यान आहे.

कोरोनावर उपचार घेत असलेल्या इराकी राजधानी बगदादमधील रुग्णालयात ऑक्सिजन टँक फुटल्यामुळे आग लागली होती. या आगीत 82 जणांचा मृत्यू आणि 110 हून अधिक लोकं जखमी झाले. इराकच्या गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या भीषण अपघातानंतर देशातील सर्व रुग्णालयांमध्ये सुरक्षा उपायांचा आढावा घेण्यास सांगितले आहे. शनिवारी दियाला ब्रिज भागातील इब्न अल खातिब रुग्णालयात ही आग लागली.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक आपला जीव वाचवण्यासाठी खिडकीतून उडी मारत होते. आगीत जखमी झालेल्या सर्व रूग्णांना इतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इराकच्या मानवाधिकार आयोगाने ट्विट केले आहे की, तेथे 28 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. 'या आगीत दोनशे लोकांना रुग्णालयातून बाहेर काढण्यात आले, असे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे.