सौदीच्या राजपुत्राची कट्टरतावाद्यांना जोरदार चपराक!

सौदी अरबमध्ये 'मॉडर्न इस्लाम' आणणार असल्याची घोषणा करत सौदीचा राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी कट्टरतावद्यांना जोरदार चपराक लगावलीय. 

Updated: Oct 25, 2017, 11:23 PM IST
सौदीच्या राजपुत्राची कट्टरतावाद्यांना जोरदार चपराक! title=

अबुधाबी : सौदी अरबमध्ये 'मॉडर्न इस्लाम' आणणार असल्याची घोषणा करत सौदीचा राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी कट्टरतावद्यांना जोरदार चपराक लगावलीय. 

रियाधमध्ये एका आर्थिक मंचावर बोलताना 'सौदी अरबला पुन्हा एकदा उदारमतवादी विचारधारा असणारा देश बनवायचाय... जो सगळ्या धर्मांसाठी आणि जगभरातील देशांसाठी खुला असेल' असं सलमान यांनी म्हटलंय. 

'आम्हाला आपल्या आयुष्यातील तीस वर्ष केवळ विनाशकारी विचारांशी झुंजत घालवायचे नाहीत. अशा विनाशकारी विचारांनाच संपवयाचंय... लवकरच आपण चरमपंथाला संपवून टाकू... आमचा देश एक उदार आणि मोकळ्या विचारांच्या इस्लामचं पालन करणारा देश असेल... इथं कट्टरतावादी विचारांसाठी कोणतंही स्थान नसेल' असंही त्यांनी म्हटलंय.

राजपुत्र सलमान यांनी फारच कमी वेळेत 'मॉडर्न आणि खुल्या विचारांचा तरुण' अशी आपली ओळख निर्माण केलीय. आपल्या देशाची प्रतिमाही त्यांना अशीच उदारमतवादी बनवण्याची इच्छा आहे. यासाठी त्यांनी '२०३० व्हिजन' देशासमोर मांडलंय. याद्वारे सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक मुद्दयांवर मोठे बदल केले जातील. 

याद्वारे महिलांच्या हिताचं जतन करण्याचाही त्यांचा संकल्प आहे. यासाठीच महिलांना गाडी चालवण्याची परवानगी देण्यासाठी चर्चाही सुरू आहे.