'Corona virusचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही भारतीय पद्धत वापरा'

इस्रायलच्या पंतप्रधानांनी नागरिकांना सुचवला प्रभावी उपाय 

Updated: Mar 5, 2020, 06:27 PM IST
'Corona virusचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही भारतीय पद्धत वापरा'  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : साऱ्या जगात भीतीचं आणि चिंतेचं वातावरण निर्माण करणाऱ्या Corona व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वैद्यकिय क्षेत्रात अनेक प्रयत्न सुरु आहेत. अनेक देशांमध्ये काही महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत. त्यातच आता इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू Benjamin Netanyahu यांनी या विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एक उपाय सुचवला आहे. 

नेत्यानाहू यांनी सुचवलेला हा उपाय थेट भारतीय परंपरेशी संबंधित आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एकमेकांना भेटलं असता हस्तांदोलन न करता म्हणजेच हात न मिळवला भारतीय पद्धतीनं नमस्ते/ नमस्कार करा असा सल्ला नेत्यानाहूंनी दिला आहे. 
कोरोना हा साथीचा आजार आहे. हस्तांदोलनानंही त्याचा प्रसार होतो. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेत्यानाहू यांनी एक आढावा बैठक घेतली. या बैठकतीत त्यांनी नागरिकांना हस्तांदोलना ऐवजी एकमेकांना भेटल्यावर भारतीयांप्रमाणे नमस्कार करा असं अवाहन केलं. 

दरम्यान, कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शक्य त्या सर्व मार्गांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये सर्दी- खोलका असल्यास त्याची योग्य ती काळजी घेत उपचार करणं, वारंवार हात स्वच्छ धुणं, टिश्यू पेपरची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणं आणि सॅनिटायझरचा वापर करणं असे प्राथमिक उपाय सुचवण्यात आले आहेत. या उपायांशिवायही नेत्यानहू यांनी थेट भारतीय संस्कृतीशी संलग्न अशा कृतीचा उल्लेख करत त्याकडे लक्ष वेधल्यामुळे काहीजणांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

वाचा : कोरोना व्हायरस : दिल्लीत उपाययोजनांसाठी बैठकांचे सत्र

सध्या इस्रायलमध्ये कोरोनाचे १५ रुग्ण आढळले आहेत. याच धर्तीवर इस्रायलमधून बाहेर न जाण्याचं आवाहन देशातील नागरिकांना करण्यात आलं आहे. शिवाय विमान वाहतुकीमध्येही काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.