...म्हणून ट्रम्प दररोज करणार कोरोना चाचणी

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली.

Updated: May 8, 2020, 01:14 PM IST
...म्हणून ट्रम्प दररोज करणार कोरोना चाचणी title=
संग्रहित फोटो

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा खासगी सुरक्षा रक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचीही कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र ट्रम्प यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली असल्याची माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. या घटनेनंतर ट्रम्प यांनी, ते रोज कोरोना चाचणी करणार असल्याचं सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पॉझिटिव्ह आढळलेला सेवक अमेरिकेच्या सैन्यदलाच्या यूनिटमधील असून तो ट्रम्प यांच्या खासगी सेवेत तैनात होता. हे यूनिट अनेकदा राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जवळ राहून काम करत असल्याची माहिती आहे. अमेरिकन नौसेनेत आणि ट्रम्प यांच्या कुटुंबासोबत खासगी सेवत असणारा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मेडिकल यूनिटकडून मिळाल्याचं व्हाईट हाऊसकडून सांगण्यात आलं. खासगी सेवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली. दोघांचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

कोरोना व्हायरस व्हाईट हाऊसपर्यंत पोहचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार कोरोना पॉझिटिव्ह आलेला व्यक्ती अनेकदा ट्रम्प यांच्यासोबत असतो. बुधवारी तो कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर, त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या व्यक्तीला नेमकी कुठून लागण झाली असेल याचाही शोध घेण्यात येत आहे.

दरम्यान, चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने आतापर्यंत 190हून अधिक देशांमध्ये थैमान घातलं आहे. अमेरिकेसारखा बलाढ्य देशही कोरोनापुढे हतबल झाला आहे. अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. अमेरिकेत 7 लाखांहून अधिक लोक कोरोनाबाधित आढळले आहेत. तर 68हजारांहून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.