'हिंदू राष्ट्रवाद भारताला युद्धाकडे ढकलतोय'-चीनी वृत्तपत्र

चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे, 'भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादामुळे दोन देशांमध्ये युद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Updated: Jul 20, 2017, 06:37 PM IST
'हिंदू राष्ट्रवाद भारताला युद्धाकडे ढकलतोय'-चीनी वृत्तपत्र title=

बिजिंग : चीन सरकारचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे, 'भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादामुळे दोन देशांमध्ये युद्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.'  चीन सरकारच्या अधिकृत वर्तमानपत्रांकडून गेल्या काही दिवसांमध्ये  भारतावर वारंवार दबाव टाकण्याचा प्रयत्न होतो आहे.

भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादामुळे भारत आणि चीन यांच्यातील तणाव वाढून परिस्थिती युद्धाच्या दिशेने जात आहेत, असे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.

भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादामुळे देश युद्धाकडे ढकलला जातो आहे. भारताचे सामर्थ्य चीनच्या तुलनेत अतिशय कमी आहे. मात्र असे असूनही नवी दिल्लीतील रणनितीकार आणि वरिष्ठ राजकीय नेते चीनबद्दलचे धोरण राष्ट्रवादाकडे झुकवत आहेत.  भारताने डोक्लाममधून सैन्य मागे घ्यावे, असे आवाहन चीनकडून वारंवार करण्यात आले आहे. मात्र तरीही भारताने आपले सैन्य माघारी बोलावले नाही,’ असे चिनी वृत्तपत्राने म्हटले आहे.

भारत, चीन आणि भूतानच्या सीमेवरील डोक्लाम भागात गेल्या महिन्याभरापासून भारत आणि चीनमध्ये संघर्ष सुरु आहे. डोक्लाम भागात चिनी सैन्याकडून रस्त्याचे काम सुरु आहे. भारतीय सैन्याने चीनच्या रस्ते निर्मितीच्या कामाला आक्षेप घेतला आहे. 

भारतीय सैन्यासोबत संघर्ष सुरु असल्याने चीनकडून तिबेटच्या डोंगराळ भागात हजारो टन दारुगोळा आणून ठेवण्यात आला आहे. चीनने सीमावर्ती भागात रस्त्यांचे जाळे निर्माण केल्याने हा दारुगोळा अवघ्या ७ ते ८ तासांमध्ये सिक्किम सीमेपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे, असे देखील यात म्हणण्यात आले आहे.

तसेच 'भारतातील वाढता हिंदू राष्ट्रवाद' या मथळ्याखाली ग्लोबल टाईम्सने लेख लिहिला आहे, 'भारतातील वाढत्या हिंदू राष्ट्रवादामुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला असून परिस्थिती युद्धाच्या दिशेने जाऊ लागली आहे, खुद्द पंतप्रधान मोदी सत्तेत आल्यापासून हिंदू राष्ट्रवादाचा वापर करत आहेत. त्यामुळे देशभरात मुस्लिमांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत. यावर मोदी यांचे कोणतेही नियंत्रण नाही.