'आयसिस' दहशतवाद्यानं सुरक्षामंत्र्याला भोसकलं, घटना कॅमेऱ्यात कैद​

दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात 

Updated: Oct 11, 2019, 10:48 AM IST
'आयसिस' दहशतवाद्यानं सुरक्षामंत्र्याला भोसकलं, घटना कॅमेऱ्यात कैद​ title=

जकार्ता : इंडोनेशियाचे मुख्य सुरक्षामंत्री विरान्तो आपल्या गाडीतून उतरताच आयसिसच्या कट्टर दहशतवाद्याने त्यांना भोसकल्याची घटना गुरुवारी घडली. या हल्ल्यात विरान्तो यांच्या पोटावर दोन खोल जखमा झाल्या आहेत तर अन्य तीन जणही हल्ल्यात जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विरान्तो गाडीतून उतरताच एक जण त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना भोसकले, असे पोलिसांचे प्रवक्ते देदी प्रासेत्यो यांना सांगितले. जावातील पांडेगलांग विद्यापीठाबाहेर एक महिला आणि एका पुरुषाने हा हल्ला केला. या हल्लेखोरांना अटक करण्यात आली आहे.

विरान्तो यांच्या पोटात दोन खोल जखमा झाल्या असून त्यावर कदाचित शस्त्रक्रिया करावी लागेल, असे असले तरी मंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे, असे बरकाह रुग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले. विरान्तो यांना हेलिकॉप्टरने जाकार्ता येथे नेण्यात आले आहे. स्थानिक पोलीस प्रमुख आणि त्यांचे दोन सहकारी असे अन्य तीन जण हल्ल्यात जखमी झाले आहेत.

हल्लेखोरांची नावे सियाहरील आलमसिह (३१) आणि फितरी आंद्रियाना (२१) अशी आहेत. हे दोघे पती-पत्नी असल्याचं समजतंय. आलमसिह हा आयसिसशी संबंधित आहे, असे पोलिसांनी सांगितले. मात्र सविस्तर तपशील पोलिसांनी दिला नाही. या दोघांनाही पोलिसांनी अटक केलीय. 

इंडोनेसियाचे १९९८ च्या विद्यार्थी बंडाच्या दरम्यान सशस्र दलाचे नेते म्हणून तसंच १९९९ मध्ये पूर्व तिमोर स्वातंत्र्य जनमत संग्रहापूर्वीच्या काही महिन्यांमध्ये मंत्री म्हणून विरान्तो यांच्यावर मानवाधिकार उल्लंघनाचे आरोप करण्यात आले होते.