International Women Day 2023: 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो महिला दिन? जाणून घ्या महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम

International Women Day 2023 History Importance Theme: दरवर्षी 8 मार्च हा दिवस जगभरात महिला दिन म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी 1977 साली या दिवसाला अधिकृत मान्यता दिली आहे.

Updated: Mar 7, 2023, 09:32 PM IST
International Women Day 2023: 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो महिला दिन? जाणून घ्या महत्त्व, इतिहास आणि यंदाची थीम title=
womens day 8 march

International Women Day 2023 Theme: 8 मार्च हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मिळवलेलं यश साजरं केलं जातं. तसेच ज्या गोष्टींमुळे आजही महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते अशा गोष्टी समुळ नष्ट करण्यासंदर्भातील आपले प्रयत्न पुरेसे आहेत की नाहीत याबद्दलचा उपापोह केला जातो. मात्र महिला दिन हा 8 मार्च रोजीच का साजरा केला जातो? याचा इतिहास काय आहे? यंदाची थिम काय आहे जाणून घ्या...

महिलांसाठी आंदोलनं...

20 व्या शतकामध्ये संपूर्ण युरोप आणि उत्तर अमेरिकेमध्ये झालेल्या कामगार आंदोलनानंतर आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली. या घटनांशी संबंधित तारखा या 19 मार्च, 15 एप्रिल, आणि 23 फेब्रुवारी या आहेत. मग असं असतानाच 8 मार्च रोजी महिला दिवस का साजरा केला जातो असा प्रश्न तुम्हाला पडणं सहाजिक आहे.

8 मार्चच का?

8 मार्चचा संबंध रशियाशी आहे. या ठिकाणी 1917 साली क्रांतीला सुरुवात झाली. एकत्र जेवण्याची मूभा आणि मताधिकाराच्या मुद्द्यावरुन रशियामध्ये महिलांनी मोठं आंदोलन सुरु केलं. या वेळेस रशियामध्ये ज्युलियन कॅलेंडरचा वापर केला जायचा. तर इतर देशांमध्ये ग्रेगोरियन कॅलेंडरचा वापर केला जायचा. म्हणजेच रशियाच्या तत्कालीन कॅलेंडरनुसार 23 फेब्रुवारीची तारीख जगाच्या दृष्टीने 8 मार्चची तारीख होती.

संयुक्त राष्ट्रांनी दिली मान्यता

संयुक्त राष्ट्रांनी 1977 साली संयुक्त राष्ट्रांनी 8 मार्च या दिवसाला आंतरराष्ट्रीय महिला दिन अशी मान्यता दिली. त्या दिवसापासून संयुक्त राष्ट्रांमधील सदस्य राष्ट्रं या दिवशी महिला दिन साजरा करतात. महिलांना समान हक्क देण्याबरोबरच लैंगिक समानतेसाठी अधिक जोमाने काम करण्याचे समान ध्येय संयुक्त राष्ट्रांमधील देशांनी समोर ठेवलं आहे. 

2023 ची थीम काय?

यंदाच्या म्हणजेच 2023 च्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाची थीम 'एम्ब्रेस इक्विटी' अशी आहे. म्हणजेच महिलांना केवळ समान संधी उपलब्ध करुन दिल्यास त्यांचा विकास होईल असं नाही. त्याचप्रमाणे इक्विटी म्हणजेच समानपणे वागणूक देणंही महत्त्वाचं आहे. "लोक वेगवेगळ्या ठिकाणाहून प्रवास सुरु करतात. त्यामुळेच सर्वांना समानतेने वागणूक मिळावी आणि त्यांना समान संधी मिळावी यासाठी प्रयत्नशील असणं आवश्यक आहे," असं यंदाच्या थीमबद्दल सांगताना म्हटलं आहे.

समानता आणि इक्विटीमधील काय?

समानता आणि इक्विटीमधील अंतर यंदाच्या मोहिमेमध्ये समजावून सांगण्यात आलं आहे. "समानतेचा अर्थ असा आहे की प्रत्येक व्यक्ती किंवा व्यक्तीच्या गटाला समान साधने उपलब्ध करुन देणे. तर इक्विटी म्हणजे प्रत्येक व्यक्तीची परिस्थिती वेगवेगळी असते त्यामुळे सर्वांना समान स्तरावर पोहचवण्यासाठी त्यांना योग्य साधनांबरोबरच समान पातळीवर नेण्यासाठीच्या संधीही त्याच प्रमाणात उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत," असं यंदाच्या अभियानाबद्दल म्हटलं आहे.