इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टरमधील अखेरचा व्हिडीओ समोर

Iran Helicopter Crash News: रविवारी इराणच्या उत्तर पश्चिम भागामध्ये अजरबैजानच्या सीमेनजीक इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर भयंकर दुर्घटनेचा शिकार झालं.   

सायली पाटील | Updated: May 20, 2024, 10:26 AM IST
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टरमधील अखेरचा व्हिडीओ समोर title=
Iran Helicopter Crash News Ebrahim Raisi last video viral

Iran Helicopter Crash News: इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी रविवारी हेलिकॉप्टर क्रॅशचा शिकार झाले. ज्यानंतर घटनास्थळी बऱ्याच तासांनंतर बचाव पथक पोहोचलं आणि तिथं हेलिकॉप्टरचे जळून खाक झालेले अवशेष त्यांच्या हाती लागल्याचं वृत्त समोर आलं. प्राथमिक स्वरुपात बचावकार्यामध्ये हवामानामुळं अनेक अडथळे आले. ज्यामुळं अपघातग्रस्त हेलिकॉप्टरही सापडण्यात आव्हानं निर्माण झाली होती. पण, त्यानंतर मात्र अपघात घडला त्या ठिकाणी बचाव पथकाला दिसलेली दृश्य पाहता हे हेलिकॉप्टर क्रॅश इतक्या भीषण स्वरुपातील होतं की त्यात कोणीही बचावल्याची शक्यता अतिशय कमीच असल्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. 

बहुतांशी वृत्तसंस्थानी रईसी यांच्या निधनासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं असलं तरीही अद्याप त्यासंदर्भात इराणकडून अधिकृत माहिती प्रतीक्षेत आहे. रईसी ज्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते तिथं त्यांच्यासमवेत इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियन आणि अजरबैजानचे माजी गव्हर्नर मालेक रहमती यांच्यासह धार्मिक नेते मोहम्मद अली आले-हाशेमसुद्धा प्रवास करत होते. 

आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार रईसी अजरबैजानला लागून असणाऱ्या एका बांधाच्या उद्घाटन सोहळ्याहून इराणला परतत होते. त्याचवेळी रविवारी वरजकान क्षेत्रामध्ये त्यांच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला होता. इथं रईसी यांच्या या हेलिकॉप्टर क्रॅशनं संपूर्ण जगाला हादरा दिलेला असतानाच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा एक व्हिडीओ शेअर केला जात आहे. 

हेसुद्धा वाचा : इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये मृत्यू झाल्याची शक्यता; घटनास्थळावरून मोठी माहिती समोर

 

सदरील कार्यक्रमासाठी हेलिकॉप्टरनं प्रवास करणाऱ्या रायसी यांचा हा प्रवासादरम्यानचाच व्हिडीओ असून, त्यामध्ये त्यांचे सहप्रवासीसुद्धा दिसत आहेत. 'एपी'नं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ते हेलिकॉप्टर प्रवास करताना दिसत असून, त्यांच्यामध्ये काही चर्चाही सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. 

इराणच्या स्थानिक तस्निम समाचार या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार रविवारी झालेल्या या हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये एकूण 9 जणांनी जीव गमावल्याची शक्यता असल्याचं चिंता वाढवणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रेड क्रिसेंटच्या हवाल्यानं अल जजिकाराच्या वृत्तानुसार जिथं हेलिकॉप्टर क्रॅश झालं तिथं कुठंही कोणीही व्यक्ती हयात असल्याचे पुरावे सापडले नव्हते. ज्यामुळं आता या दुर्घटनेच्या अधिकृत माहितीचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.