मालवणी माणसाने दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; जगातील पाचवे समलैंगिक पंतप्रधानांचा पायउतार

Ireland Indian Origin Prime Minister Leo Varadkar: मालवणचो झील अशी ओळख असणाऱ्या या पंतप्रधानांचं नाव तुम्हीही ऐकलं असेल.   

सायली पाटील | Updated: Mar 22, 2024, 10:57 AM IST
मालवणी माणसाने दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा; जगातील पाचवे समलैंगिक पंतप्रधानांचा पायउतार title=
Ireland Indian Malvani Origin Prime Minister Leo Varadkar resigned from the post

Ireland Indian Origin Prime Minister Leo Varadkar: भारतीय वंशाची अनेक माणसं परदेशात स्थायिक होऊन तिथंही देशाचं नाव उंचावताना दिसत आहेत. त्यातील एका नावाचा महाराष्ट्राला आणि त्याहूनही महाराष्ट्रातील कोकणवासियांना कमालीचा अभिमान वाटतो. हे नाव म्हणजे लियो वराडकर यांचं. कारण, भारतीय वंशांच्या लिओ वराडकर यांनी आयर्लंडच्या पंतप्रधानपदाची (Ireland Prime Minister) जबाबदारी अतिशय कमालीनं पार पाडली. ज्यानंतर आता त्यांनी या पदावरून राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 

45 वर्षीय लिओ वराडकर यांनी बुधवारी ही अधिकृत घोषणा करत आपण आयर्लंडमधील युती सरकारचा भाग असणाऱ्या फाईन गेल पक्षाच्या अध्यपदाचाही त्याग करत असल्याचं सांगितलं. उत्तराधिकाऱ्याची निवड झाल्यानंतर ते देशाच्या पंतप्रधानपदा चा रितसर राजीनामा देणार आहेत. दरम्यान, पक्षश्रेष्टींच्या सल्ल्यानं एका व्यक्तीची निवड केल्यानंतकर त्या व्यक्तीकडे देशाच्या पंतप्रधानपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. वराडकर यांनी अद्याप पदत्याग करण्यामागचं स्पष्ट कारण सांगितलं नसून यामागं वैयक्तिक आणि राजकीय कारणं असल्याचं मात्र सुचवलं. 

आतापर्यंत वराडकर यांनी जून 2017, फेब्रुवारी 2020 डिसेंबर 2022 मध्ये देशाचं प्रमुखपद ‘ताओसीच’ भूषवलं. त्यांच्यावर जेव्हा पहिल्यांदाट ही जबाबदारी सोपवण्यात आली होती तेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी येणारे ते सर्वात कमी वयाचे नेते होते. वराडकर आणखी एका कारणामुळं चर्चेचा विषय ठरले ती म्हणजे त्यांची समलैंगिंक पंतप्रधान म्हणून असणारी ओळख. वराडकर यांनी जाहीरपणे त्यांची ही ओळख जगासमोर आणली होती. 

भारताशी, महाराष्ट्राशी वराडकर यांचं खास नातं 

18 जानेवारी 1979 मध्ये वराडकर यांचा जन्म डब्लिन येथे झाला होता. त्यांच्या आई एक परिचारिका असून, त्या मुळच्या आयर्लंडच्या रहिवासी होत्या. त्यांचे वडिल अशोक वराडकर भारतीय प्रवासी असून, ते एक डॉक्टर होते. 1960 मध्ये वराडकर इंग्लंडमध्ये नॅशनल हेल्थ सर्विसमध्ये काम करताना त्यांच्या आई- वडिलांची पहिली भेट झाल्याचं म्हटलं जातं. वराडकर यांचे वडील अशोक, मूळचे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवास. 1960 च्या सुमारास त्यांनी परदेशाची वाट धरली आणि ते तिथंच स्थायिक झाले. 

हेसुद्धा वाचा : 'भयभीत हुकूमशाहा...' केजरीवालांना अटक होताच राहुल गांधींचा मोदींवर शाब्दिक प्रहार

लिओ वराडकर यांचा जन्म आय़र्लंडमध्येच झाला. सेंट फ्रांसिस नॅशनल स्कूलमध्ये त्यांचं प्राथमिक शिक्षण पार पडलं. पुढं त्यांनी एका खासगी शाळेत प्रवेश मिळवला. 2003 मध्ये त्यांनी डब्लिनच्या ट्रिनिटी कॉलेज येथून वैद्यकिय शिक्षणातील पदवी मिळवली. पण, सुरुवातीपासूनच राजकारणात रस असल्यामुळं त्यांनी 2007 मध्ये डब्लिन वेस्ट येथून फाईन गेल पक्षाच्या तिकीटावर निवडणूक जिंकली आणि ते वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी काऊन्सिलरपदी विराजमान झाले. 

काही वर्षांपूर्वी म्हणजेच 2019 मध्ये लिओ वराडकर भारतात आले होते. यावेळी त्यांनी सिंधुदुर्गातील वराड या मूळ गावालाही भेट दिली होती. वडिलांच्या मूळ गावी येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. यावेळी त्यांना भेटण्यासाठी गावकरी आणि वराडकर कुटुंबीयांनी गर्दी केली होती.