...अन् बायडन यांनी त्या महिलेला सर्वांसमोर मारली मिठी; माथ्याचं घेतलं चुंबन

Biden In Israel: इस्रायलमधील गाझा पट्टीला लागून असलेल्या प्रांतांमध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी 7 ऑक्टोबर रोजी मोठ्याप्रमाणात घुसखोरी करुन हिंसाचार केला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 20, 2023, 01:53 PM IST
...अन् बायडन यांनी त्या महिलेला सर्वांसमोर मारली मिठी; माथ्याचं घेतलं चुंबन title=
बायडन हे बुधवारी इस्रायलच्या दौऱ्यावर होते

65 Year Israeli Granny Vs Hamas Terrorists: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 7 ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हिंसाचारामध्ये आपला जीव वाचवणाऱ्या इस्रायलमधील नागरिकांची भेट घेतली. यामध्ये 65 वर्षीय रचेल एड्री या आजीबाईंचाही समावेश होता. रचेल यांना हमासच्या 5 दहशतवाद्यांनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्याच घरामध्ये 20 तास ओलीस ठेवलं होतं. बायडन यांनी हमासविरुद्ध इस्रायलदरम्यान युद्ध सुरु असतानाच इस्रायलला समर्थन दर्शवण्यासाठी थेट इस्रायलचा दौरा केला. बुधावारी बायडेन इस्रायलमध्ये होते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, रचेल यांना दहशतवाद्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी त्यांना जेवण, पाणी दिलं. तसेच त्यांच्याशी रचेल अगदी सामान्यपणे गप्पा मारत होत्या. अखेर इस्रायलच्या लष्कराने रचेल यांची सुरक्षित सुटका केली. 

मिठी आणि माथ्यावर चुंबन

बायडन आणि रचेल यांची भेट झाली तेव्हा अधिकाऱ्यांनी रचेल यांच्याबरोबर नक्की काय घडलं हे बायडेन यांना सांगितलं. हा संपूर्ण थरार ऐकून बायडन यांनी रचेल यांना मिठी मारत त्यांचं सांत्वन केलं. आपल्याबरोबर घडलेला प्रकार पुन्हा ऐकून रचेल यांना अश्रू अनावर झाले. बायडन यांनी रचेल यांना मिठी मारत त्यांच्या माथ्याचं चुंबन घेत त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. हा भावूक क्षण अमेरिकी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.

नक्की घडलेलं काय?

अमेरिकेतील टीव्ही नेटवर्क सी-स्पॅनने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रचेल आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन एकमेकांची भेट घेताना दिसत आहेत. 7 ऑक्टोबर रोजी गाझा पट्टीमधून हमासच्या शेकडो दहशतवाद्यांनी घुसखोरी केली. त्यांनी गाझामधून इस्रायलच्या ताब्यातील प्रदेशात प्रवेश करत मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. मोठ्या प्रमाणात या दहशतवाद्यांनी हिंसाचार घडवूवन आणला. रचेल आणि त्यांचे पती डेव्हिड यांना हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं होतं. चॅनेल 12 ने दिलेल्या बातमीनुसार, डेव्हिड यांनी दहशतवाद्यांनी आमच्यासमोर हिंसाचार केला नाही असं सांगितलं. या दहशतवाद्यांनी 'आम्हाला शहीद व्हायचं आहे' असं आम्हाला सांगितल्याचंही डेव्हिड म्हणाले.

'कॉफी आणि कुकीज करुन दिल्या'

जेव्हा इस्रायलचे लष्करी जवान पोहोचले तेव्हा दहशतवाद्यांनी रचेल यांच्या डोक्यावर हॅण्डग्रेनेड ठेवला. या हॅण्डग्रेनेडची पीन काढण्याची ते धमकी देत होते. दहशतवाद्यांनी इस्रायलच्या लष्करी अधिकाऱ्यांबरोबर केलेल्या चर्चेदरम्यान या जोडप्याला आम्ही जीवे मारुन टाकू अशी धमकी दिली होती. 'द टाइम्स ऑफ इस्रायल'ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षादलांनी रचेल यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचा विचार केला होता. त्यावेळेस हे घर एका पोलीस अधिकाऱ्याचं असून आतमध्ये एका वयस्कर जोडप्याला दहशतवाद्यांनी ओलीस ठेवण्यात आल्याचं सांगितलं. 'चॅनेल 12'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये रचेल यांनी, "ते फार संतापलेले होते. मी त्यांना तुम्हाला भूक लागली आहे का असं विचारलं. मी त्यांना कॉफी आणि कुकीज करुन दिल्या," असं सांगितलं.

...अन् त्यांची सुटका झाली

"रचेलने त्यांना भंडावून सोडलं होतं. ती त्यांना सतत तुम्हाला काही हवं आहे का असं विचारत होती," असं डेव्हिड यांनी सांगितलं. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रचेलने जखमी झालेल्या एका दहशतवाद्याच्या हातावर मलमपट्टीही केली. या जखमी दहशतवाद्याला धीर देण्याचा प्रयत्न रचेल यांनी केला. दहशतवाद्यांचं लक्ष विचलित करुन सुरक्षा यंत्रणांना मार्ग मोकळा करुन देण्यासाठी रचेल यांनी दहशतवाद्यांना गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. "मी सारं काही फक्त जिंवत राहण्यासाठी करत होते. मला मदत पोहोचेपर्यंत हे करणं गरजेचं होतं," असं रचेल म्हणाल्या. दहशतवाद्यांचं लक्ष रचेल यांनी विचालित करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच इस्रायली लष्कराचे जवान घरात घुसले आणि त्यांनी दहशतवाद्यांचा खात्मा केला. या दोघांचीही सुखरुप सुटका करण्यात आली.