म्हणून किम जोंग पोर्टेबल टॉयलेट घेऊन सिंगापूरला गेले

किम जोंग ऊन यांचा आणखी एक विचित्र प्रकार उघड

Updated: Jun 12, 2018, 11:43 PM IST
म्हणून किम जोंग पोर्टेबल टॉयलेट घेऊन सिंगापूरला गेले  title=

सिंगापूर : अजब वागणं, विचित्र नियम, वैयक्तिक आयुष्यात अजब केशभूषा यांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांचा आणखी एक विचित्र प्रकार उघड झालाय. सिंगापूरमध्ये अमेरिकेसोबत शिखर परिषदेसाठी आलेल्या किम जोंग यांची सोय जरी सेंट रेगीस या पंचतारांकीत हॉटेलात झाली असली तरी त्यांनी स्वतः सोबत स्वतःचं पोर्टेबल टॉयलेट आणलं आहे. असंच टॉयलेट त्यांनी याआधी दक्षिण कोरियाच्या अध्यक्षांना भेटतानाही सोबत नेलं होतं. एवढंच नाही तर अगदी उत्तर कोरियातही फिरताना ते स्वतःचं टॉयलेट घेऊन जातात. स्वतःच्या विष्ठेतून त्यांच्या आयुष्यातली गुपीतं परदेशी गुप्तहेर शोधून काढतील अशी भीती त्यांना वाटते म्हणे. त्यांना असलेल्या विकारांचा याद्वारे शत्रूंना शोध लागला तर त्याचा गैरफायदा घेतला जाईल अशी भिती त्यांना सतावते. म्हणून किम जोंग ऊन जिथे जातात तिथे त्यांचं स्वतःचं टॉयलेटच घेऊन जातात.

किम जोंग- डोनल्ड ट्रम्प भेट

दरम्यान भूतकाळात झालं गेलं विसरून जाऊ आणि नव्यानं सुरुवात करू,  असा निश्चय करत अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशाह यांच्यात विविध मुद्द्यांवर करार झालेत. किम जोंग सगळ्या जगाचं लक्ष असलेली अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकुमशाह किम जोंग उन यांची ऐतिहासिक भेट झालीये. सिंगापूरमधल्या सेंटोसा बेटावरच्या कॅपेला हॉटेलमध्ये दोघांमध्ये साधारणपणे पन्नास मिनिटं चर्चा झाली.

दोन्ही देशांदरम्यानचे संबंध चांगले राहतील, असा विश्वास दोघांनीही व्यक्त केला. अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन देशांमध्ये नातेसंबंध प्रस्थापित करण्यासाठी बरेच अडथळे होते. पण या भेटीसाठी अडथळे पार केल्याचं किम जोंग ऊन यांनी म्हटलंय.  जगातले सुमारे तीन हजार पत्रकार या भेटीच्या वार्तांकनासाठी आलेत. चर्चा यशस्वी झाली तर दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन देशांच्या दरम्यानचा तणाव तसंच अमेरिका आणि उत्तर कोरियामधील तणावही कमी होणार आहे. ६८ वर्षानंतर अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन देशांमध्ये चर्चा होतेय.