आर्थिक मंदीची चाहूल! दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात

जगातील दिग्गज कंपन्यांकडूनआर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची कपात करण्याचे संकेत दिले जात आहेत. मायक्रोसॉफ्ट कंपनीने तर मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

Updated: Jul 14, 2022, 03:13 PM IST
आर्थिक मंदीची चाहूल! दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टकडून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात  title=

नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टने मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केलं आहे. कंपनीचे सीईओ सत्या नडेला यांनी कंपनीच्या रिस्ट्रक्चरींग प्रक्रियेचा भाग म्हणून 1800  कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

आर्थिक मंदी

जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत जगातील दिग्गजांकडून कपात केली जात आहे. मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयात आणि उत्पादन विभागातील 1.81 लाख कर्मचार्‍यांपैकी सुमारे 1 टक्के, म्हणजेच सुमारे 1800 कर्मचार्‍यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांत पहिल्यांदाच कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.

कपातीचे कारण

मायक्रोसॉफ्टने देखील कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या कारणांचा खुलासा केला आहे. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, सर्व कंपन्यांप्रमाणेच आम्ही आमच्या व्यवसायाच्या प्राधान्यक्रमांचे नियमितपणे मूल्यांकन करतो आणि त्यानुसार संरचनात्मक समायोजन करतो.आम्ही आमच्या व्यवसायात गुंतवणूक करत राहू आणि येत्या वर्षभरात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवू.

कंपनीमध्ये मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या कपाती व्यतिरिक्त, विंडोज, टीम्स आणि ऑफिस ग्रुप्समध्ये नवीन भरती कमी केली आहे.

या कंपन्यांमध्येही कर्मचाऱ्यांची कपात

मायक्रोसॉफ्टशिवाय अलीकडेच जगातील इतर दिग्गज कंपन्यांनीही मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. अलीकडेच, ट्विटरने आपल्या रिक्रूटमेंट टीममधील 30 टक्के लोकांना कामावरून काढून टाकले होते.

त्याचबरोबर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांची कंपनी टेस्लानेही अमेरिकेतील कार्यालय बंद करून शेकडो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे.