NASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं; 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार

NASA ने पुढील वर्षासाठी धोक्याचा इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी आतापासूनच तयारीला लागा, अन्यथा फार मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल असं सांगितलं आहे. यावर्षीचा जुलै महिना 1880 नंतरचा सर्वात उष्ण होता. पण 2024 मध्ये यापेक्षा भयानक स्थिती असणार आहे. यासाठी प्रत्येक देशाला तयारी करावी लागणार आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 16, 2023, 05:23 PM IST
NASA ने जगाला दिला इशारा, पुढचं वर्ष फार धोक्याचं; 1880 नंतर पहिल्यांदाच असं घडणार  title=

अमेरिकेतील अंतराळ संसोधन संस्था नासाने (NASA) यावर्षीचा जुलै महिना हा 1880 नंतरचा सर्वाधिक उष्ण (Temperature) महिना होता याला दुजोरा दिला आहे. यासह नासाने जगाला भविष्यातील एका धोक्याचा इशारा दिला आहे. तो म्हणजे, 2024 मध्ये उष्णता प्रचंड वाढणार आहे. आणि त्यासाठी आपल्याला आतापासूनच तयारी करावी लागणार आहे. जर योग्य तयारी केली नाही, तर अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागू शकतो असं नासाने स्पष्ट सांगितलं आहे. 

सध्या जग वेगवेगळ्या नैसर्गिक संकटांचा सामना करत आहे. ज्यामुळे पृथ्वी संकटांच्या कचाट्यात आहे. जगभरातील देशांमध्ये तापमान वाढलं असून, त्याच्यात दिवसेंदिवस वाढच होत आहे. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी सांगितलं आहे की, नासाचा डेटा या गोष्टीची खात्री करत आहे की यावर्षी करोडो लोकांनी भयानक उष्णतेचा अनुभव घेतला आहे. जुलै महिना सर्वात उष्ण महिना म्हणून नोंदवला गेला आहे. 

बिल यांनी सांगितलं आहे की, अमेरिका असो किंवा अन्य देश सर्वजण हवामानाच्या संकटाचा सामना करत आहेत. यामागील कारणं, विज्ञान समजून घेण्याची गरज आहे. अन्यथा पृथ्वी राहण्यालायक असणार नाही. आपल्याला आपल्यासह पृथ्वी आणि पर्यावरणालाही वाचवायचं आहे. यावर्षी 3 जुलै ते 7 ऑगस्टपर्यंत सलग 36 दिवस भयानक उष्णता होती. तापमानाचा पारा पूर्णपणे वाढलेला होता. 

वातावरणात जाणारे कार्बन उत्सर्जन आणि त्यासोबत एल-निनोचा प्रभाव या दोन गोष्टींमुळे जगात उष्णता वाढली आहे. अमेरिकेपासून ते चीनपर्यंत कोणत्याही देशात थंड वातावरण नाही. तापमान सामान्यपेक्षा जास्त आहे. चीनमध्ये तर उष्णतेमुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. उष्णतेमुळे कॅनडा, रशिया, युरोप, आफ्रिका आणि अनेक बेटांवरील जंगलात आग लागली आहे. अमेरिका, मध्य-पूर्व, आशिया आणि युरोपमध्ये पावसाळी वादळं आणि पावसामुळे पूर आल्याचं पाहायला मिळालं. 

दुसरीकडे, NOAA च्या प्रमुख सारा कॅपनिक यांनी सांगितलं आहे की, माणसाने जेव्हापासून उष्णतेची नोंद ठेवण्यास सुरुवात केली आहे, तेव्हापासून 2023 तिसरं सर्वात उष्ण वर्षं होतं. यासह अल-निनोचा प्रभाव दिसणार आहे. नासाच्या गोडार्ड इन्स्टिट्यूट फॉर स्पेस स्टडीजचे गैविन श्मिट म्हणतात की, 2024 मध्ये जास्त उष्णता असणार आहे. जर तापमानात 1.1 डिग्री सेल्सिअस वाढ जरी झाली तरी संकट येईल. सध्या तापमानात 0.4 सेल्सिअस वाढ झाली आहे. 

बर्कलेचे पर्यावरणवादी जेके हॉसफादर यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं आहे की, एल निनो पुढील वर्षी खूप संकटे आणणार आहे. आपण विचार करत आहोत त्यापेक्षा ते जास्त गरम होणार आहे. अनेक भागात अनेक संकटे येतील. आम्ही अनेक दशकांपासून चेतावणी देत ​​आहोत परंतु जीवाश्म इंधनाचा वापर थांबत नाही.