मसूद अजहर प्रकरणी कोणाच्या दबावाखाली येणार नाही- पाकिस्तान

 मसूद अजहरवर प्रतिबंध आणण्यासाठी कोणाच्या दबावाखाली येणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.

Updated: Apr 19, 2019, 08:07 AM IST
मसूद अजहर प्रकरणी कोणाच्या दबावाखाली येणार नाही- पाकिस्तान  title=

इस्लामाबाद : मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचे अनेक प्रयत्न भारत सरकारकडून होत आहेत. पण याला नेहमीप्रमाणे पाकिस्तानकडून आडकाठी आणली जात आहे. मसूद अजहरवर प्रतिबंध आणण्यासाठी कोणाच्या दबावाखाली येणार नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता मोहम्मद फैसल यांनी गुरूवारी याबद्दल माहिती दिली. 

जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अजहरने भारतात असंख्य हल्ले घडवून आणले आहेत. पुलवामात झालेला आत्मघाती हल्ल्या मागचा मास्टर माईंड देखील मसूद अजहर हाच होता. मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला महत्त्वाच्या देशांनी पाठींबा दिला. पण चीनने तांत्रिक बाब पुढे करत याला नेहमी विरोध केला. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने यांसदर्भात चीनला अल्टीमेटम दिले. अजहरला पाकिस्तान पाठींबा देत असल्याचे स्पष्ट आहे. 

अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यावर चीनने आडकाठी आणली. याप्रकरणी फैसल यांनी भाष्य केले. याप्रकरणी पाकिस्तान जे निर्णय घेईल तो राष्ट्रहिताचा असेल असे ते म्हणाले. पाकिस्तान याप्रकरणी कोणाच्या दबावाखाली येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस यांनी कोणता अल्टीमेटम नसल्याचे बुधवारी चीनने म्हटले.