सौदीच्या राजपुत्राला पाकिस्ताकडून सोन्याने मढवलेली मशीनगन भेट

पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकट्या पडलेल्या पाकिस्तानला सौदीचा मोठा आधार आहे.

Updated: Feb 20, 2019, 06:48 PM IST
सौदीच्या राजपुत्राला पाकिस्ताकडून सोन्याने मढवलेली मशीनगन भेट title=

इस्लामाबाद: सौदीचे राजपूत्र महंमद बिन सलमान यांनी पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला दिलेल्या भेटीची सध्या आंतरराष्ट्रीय वर्तुळात बरीच चर्चा सुरु आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर सौदीचे राजपूत्र ही भेट रद्द करतील, अशी अपेक्षा होती. मात्र, पाकिस्तानने आपली सर्व ताकद पणाला लावून सौदीच्या राजपूत्राचा हा दौरा यशस्वी केला होता. यावेळी पाकिस्तानच्या खासदारांनी राजपूत्र महंमद बिन सलमान यांना सोन्याने मढवलेली मशीनगन भेट म्हणून दिल्याचे समजते. पुलवामा हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकट्या पडलेल्या पाकिस्तानला सौदीचा मोठा आधार आहे. त्यामुळे राजपूत्र महंमद बिन सलमान यांचा दौरा पाकिस्तानच्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाचा होता. या दौऱ्यात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी स्वत: राजपूत्र महंमद बिन सलमान यांच्या गाडीचे सारथ्य केले होते. तसेच पाकिस्तानकडून त्यांना 'निशान ए पाकिस्तान' हा पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले. एवढेच नव्हे तर राजपूत्र महंमद बिन सलमान यांच्या दिमतीला लढाऊ विमान देण्यात आले होते. पाकिस्तानात आल्यावर २१ तोफांची सलामी आणि गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या दौऱ्यावेळी राजपूत्र महंमद बिन सलमान यांनी पाकिस्तानमध्ये २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचेही जाहीर केले होते. सौदीच्या या गुंतवणुकीमुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार आहे. 

दरम्यान, पाकिस्तान दौऱ्यानंतर राजपूत्र महंमद बिन सलमान यांनी भारतालाही भेट दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजपूत्र महंमद बिन सलमान यांनी संयुक्त निवेदनही जारी केले. मात्र, त्यावेळी राजपूत्र महंमद बिन सलमान यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भाष्य करणे टाळले. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांना राजनैतिकदृष्ट्या एकाकी पाडण्याची गरज असल्याचे मोदींनी सांगितले.