मोदी विमानातून उतरले, राष्ट्रगीत सुरु झालं अन् अचानक आला पाऊस... त्यानंतर काय झालं पाहा

PM Modi Stands In Rain: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीच्या विमानतळावर दाखल झाले. यावेळेस अचानक जोरदार पाऊस सुरु झाला आणि त्यानंतर जे काही घडलं ते सध्या व्हायरल होत आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 22, 2023, 12:23 PM IST
मोदी विमानातून उतरले, राष्ट्रगीत सुरु झालं अन् अचानक आला पाऊस... त्यानंतर काय झालं पाहा title=
पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत

PM Modi Stands In Rain: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आज अमेरिकेतील आपल्या पहिल्याच राजकीय दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी वॉशिंग्टनमध्ये पोहोचले. राजकीय शिष्टाचारानुसार पंतप्रधान मोदींचं स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांचं विशेष जेट विमानतळावर लॅण्ड झाल्यानंतर जोरदार पाऊस सुरु झाला. मात्र पंतप्रधान मोदींनी पाऊस थांबण्याची वाट न पाहता विमानातून उतरण्यास सुरुवात केली. मोदींच्या सन्मानार्थ अनेक अधिकारी विमानतळावर उपस्थित होते. यावेळेस दोन्ही देशांची राष्ट्रगीतं वाजवण्यात आली. राष्ट्रगीत सुरु असतानाच पंतप्रधान मोदी सावधान स्थितीमध्ये उभे होते. जोरात पाऊस सुरु असतानाही मोदी राष्ट्रगीत संपेपर्यंत एकाच जागी उभे असल्याचं पहायला मिळालं.

भाजपाने शेअर केला व्हिडीओ

या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ भारतीय जनता पार्टीने आपल्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट केला आहे. पंतप्रधान मोदी वॉशिंग्ट डीसीमध्ये पोहचले तेव्हा त्यांनी भारतीयांनी उत्साहात केलेलं स्वागत आणि इंद्रदेवतेच्या कृपने ही भेट अधिक विशेष झाली आहे असं म्हटलं. पंतप्रधान मोदींचं व्हाइट हाऊसमध्येही राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि फर्स्ट लेडी झिल बायडेन यांनी उत्साहात स्वागत केलं. "पंतप्रधान मोदींचं राजकीय शिष्टाचारानुसार स्वागत करण्यात आलं. जोरदार पाऊस आणि वारा यावेळी वॉशिंग्टन डीसीमधील जॉइण्ट बेस अॅण्ड्र्यूसवर वाहत होता," अशी कॅप्शन भाजपाने या व्हिडीओला दिली आहे.

मोदी ठरले दुसरे पंतप्रधान

पंतप्रधान मोदी मागील 9 वर्षांमध्ये पंतप्रधान म्हणून 6 व्यांदा भेट दिली. मात्र यंदाची भेट ही फार खास आहे कारण ही पाहिलीच राजकीय भेट आहे. म्हणजेच या भेटीचं आमंत्रण राष्ट्राध्यक्षांनी मोदींना दिलं होतं. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी हे भारताचे केवळ दुसरे पंतप्रधान आहेत ज्यांनी महासत्ता असलेल्या अमेरिकेला राजकीय भेट दिली आहे. यापूर्वी 2009 साली तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अमेरिकेला अशी भेट दिली होती. 

आतापर्यंत या दौऱ्यात काय काय झालं?

मंगळवारी पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये पोहोचले आहेत. भारतीयांनी मोदींचं फार उत्साहामध्ये स्वागत केलं. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी मोदींनी अनेक मान्यवरांची भेट घेतली. त्यानंतर मोदींनी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयामध्ये आयोजित योग दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदींनी अनेक उद्योजकांची भेट घेतली ज्यामध्ये एलॉन मस्क यांचाही समावेश होता.