सहायकाच्या (Assistant) पदाच्या मुलाखतीसाठी कंपनीत गेलेल्या एका महिलेचा दुर्देवी मृत्यू झाल्याची एक घटना समोर आली आहे. कंपनीच्या वर्कशॉपमध्ये झालेल्या एका दुर्घटनेत तिचा मृत्यू झाला. ही महिला 7 आठवड्याची गर्भवती होती.
21 वर्षीय उमिदा नाझरोवा (Umida Nazarova) नावाची महिला शॉप असिस्टंटच्या नोकरीसाठी स्वारमेट फॅक्टरीत (Svarmet Factory) गेली होती. हा कारखाना वेल्डिंग वायर आणि इलेक्ट्रोड तयार करतो. ही घटना बेलारुसमधली (Belarus) आहे.
मशीनमध्ये अडकले केस
मुलाखती झाल्यानंतर तिला कामाची ओळख व्हावी यासाठी काही कर्मचार्यांनी उमिदा नाझरोव्हाला वर्कशॉपचा फेरफटका मारण्यासाठी नेलं. यावेळी काम सुरु असलेल्या एका मशिनमध्ये उमिदाचे केस अडकले आणि ती मशिनमध्ये खेचली गेली. हे इतक्या अचानक घडलं की बाजूला असलेल्या कर्मचाऱ्यांना तिला वाचवण्याची संधीही मिळाली नाही. या दुर्घटनेत उमिदाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
20 दिवस होती बेशुद्ध
गंभीर जखमी अवस्थेत उमिदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णलयात ती तब्बल 20 दिवस बेशुद्ध अवस्थेत होती. पण अखेर 20 दिवसांनी तिची मृत्यूशी झुंज संपली.
उमिदाचे वडील दिमित्री यांनी कंपनीवर आरोप केले आहेत. कारखान्यात सुरक्षेची कोणतीही उपाययोजना नव्हती, 'अपघाताने दोन जणांचा जीव घेतला, मुलगी सात आठवड्यांची गरोदर होती, असं त्यांनी म्हटलं आहे.
बेलारूसच्या तपास समितीने यावर आपलं म्हणणं मांडलं आहे. कारखान्यातील एक कामगार उमिदाला मशीन कसे काम करते हे दाखवत होता, तर दुसरा कामगार रजिस्टरमध्ये नोंदी लिहिण्यात व्यस्त होता. उमिदाच्या अंतिमसंस्काराचा खर्च कंपनीने कुटुंबियांकडे दिला आहे.