अत्याधुनिक राफेल विमाने वायुदलात दाखल, भारताचा चीनला इशारा

फ्रान्सकडून खरेदी केलेली राफेल विमाने आज औपचारिकरित्या वायुदलात दाखल झाली. 

Updated: Sep 10, 2020, 05:31 PM IST
अत्याधुनिक राफेल विमाने वायुदलात दाखल, भारताचा चीनला इशारा  title=
Pic Courtesy: ANI

नवी दिल्ली : फ्रान्सकडून खरेदी केलेली राफेल विमाने आज औपचारिकरित्या वायुदलात दाखल झाली. अंबालास्थित १७ गोल्डन ऍरो स्क्वॉड्रनमध्ये देशात आलेली पहिली पाच राफेल विमाने समारंभपूर्वक दाखल झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्या उपस्थितीत पहिली पाच राफेल विमाने वायुदलात दाखल झाली. दरम्यान, राजनाथ सिंह यांनी यावेळी चीनचे नाव न घेता इशारा दिला. 

या राफेल विमानांची सर्वधर्म पूजा करण्यात आली. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ख्रिस्ती धर्मोपदेशकांनी मंत्रपठण केलं. त्यानंतर राफेल वायुदलातल्या अन्य विमानांनी थरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. त्यानंतर वायुदलात दाखल होत असलेल्या राफेल विमानांना वायुदलाच्या परंपरेप्रमाणे वॉटर कॅननद्वारे सलामी देत वायुदलात दाखल करून घेण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सीडीएस जनरल बिपीन रावत, डीआरडीओचे प्रमुख जी सतीश रेड्डी, दसॉल एव्हिएशनचे प्रमुख एरिक ट्रॅपीयरही या सोहळ्याला उपस्थित होते. 

तीन ते चार राफेल विमानांची पुढची तुकडी ऑक्टोबर महिन्यात तर तिसरी तुकडी डिसेंबर महिन्यात दाखल होत आहे. भारतीय हवाई दलात राफेल लढाऊ विमानांचा समावेश हा संपूर्ण जगासाठी आणि खासकरुन आमच्या सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांसाठी एक मोठा आणि कठोर संदेश आहे," असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अंबाला हवाई तळावरील कार्यक्रमात बोलताना म्हणाले.